Beed: गंभीर आजार, पतीने साथ सोडली, पण तिच्यासाठी ‘देवदूत’ धावला, काय केलं?
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Beed News: पतीने सोडून दिल्याने ही 35 वर्षीय महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होती.
बीड: सुख-दुःखात साथ देण्याची शपथ घेतलेल्या पतीने साथ सोडली. पण, बीडच्या जिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी माणुसकीचं दर्शन घडवत मोठा निर्णय घेतला. आर्थिक परिस्थितीमुळे उपचारापासून वंचित 35 वर्षीय महिलेसाठी ते देवदुतासारखे धावले. गंभीर आजाराचा सामना करत असणाऱ्या या महिलेवर ‘मायोमेक्टॉमी’ (गर्भाशयातील गाठी काढण्याची) शस्त्रक्रिया यशस्वी केली. विशेष म्हणजे जिल्हा रुग्णालयात अशा प्रकारची शस्त्रक्रिया पहिल्यांदाच पार पडली.
गेल्या काही काळात पतीने सोडून दिल्याने ही 35 वर्षीय महिला मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करत होती. गर्भपिशवीतील गाठींमुळे होणारा त्रास असह्य झाला होता. परंतु, आर्थिक चणचणीमुळे उपचार तिला परवडणारे नव्हते. चार दिवसांपूर्वीच ती जिल्हा रुग्णालयात दाखल झाली. शेवटी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एल. आर. तांदळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. राजेंद्र ढाकणे, डॉ. पूनम लोध आणि डॉ. विद्या नागरगोजे यांच्या पथकाने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
डॉक्टर देवदुतासारखे मदतीला धावल्याने ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली. या मदतीमुळे महिलेला आर्थिक तसेच आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा मिळाला. जिल्हा रुग्णालयातील आरोग्य यंत्रणेच्या तत्पर आणि यशस्वी कार्याचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे.
मायोमेक्टॉमी म्हणजे काय?
गर्भाशयातील गाठींना मायोमा असंही म्हणतात. मायोमेक्टॉमी ही एक वैद्यकीय शस्त्रक्रिया आहे. याद्वारे गर्भाशयातील 'फाइब्रॉइड्स' म्हणजेच गर्भाशयाच्या गाठी काढून टाकल्या जातात. गाठींमुळे जास्त रक्तस्त्राव होणे, ओटीपोटात दुखणे किंवा वंध्यत्वाचा त्रास असतो, त्यांच्यासाठी ही शस्त्रक्रिया केली जाते.
Location :
Bid (Beed),Bid,Maharashtra
First Published :
Mar 12, 2026 9:54 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Beed: गंभीर आजार, पतीने साथ सोडली, पण तिच्यासाठी ‘देवदूत’ धावला, काय केलं?








