कुख्यात दहशतवादी शाकीब नाचनच्या घरावर ATS ची छापेमारी, 22 पथकांकडून झडती, नेमका डाव काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
ATS Raid in Bhiwandi Padgha: महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा इथं मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी एटीएसची २२ पथकं पडघा गावात दाखल झाली.
भिवंडी: महाराष्ट्र एटीएसने ठाणे जिल्ह्याच्या भिवंडी तालुक्यातील पडघा इथं मोठी कारवाई केली आहे. आज सकाळी एटीएसची २२ पथकं पडघा गावात दाखल झाली. एटीएसने २२ ते २३ संवेदनशील ठिकाणांवर छापेमारी केली आहे. या छापेमारीत विविध संवेदनशील माहिती हाती लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एटीएसच्या पथकाने कुख्यात दहशतवादी शाकीब नाचनच्या घरावर देखील छापे टाकले आहेत. त्यामुळे मोठा दहशतवादी कट उधळल्याची चर्चा आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटे एटीएसची २२ पथकं पडघा इथं दाखल झाली. भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटने संदर्भात ही मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती आहे. आगामी काळात महाराष्ट्रात मोठा दहशतवादी कट रचण्याची तयारी भिवंडीतील पडघा इथं सुरू होती. याबाबतची गुप्त माहिती मिळाली असता एटीएसने २२ ते २३ ठिकाणांवर छापेमारी केली. या कारवाईतून मोठ्या दहशतवादी संघटनांचं बिंग फुटण्याची शक्यता आहे. शिवाय समाजातील प्रतिष्ठित आणि मोठ मोठ्या लोकांची दहशतवादी संघटनांशी लिंक समोर येण्याची शक्यता. ही कारवाई गुप्तपणे केली जात आहे. सकाळपासून पडघा भागात १०० पेक्षा जास्त लोकांची चौकशी केल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
एटीएस पथकाने शाकीब नाचनच्या घरावरही छापा टाकला आहे. शाकीब हा भारतात बंदी घातलेल्या स्टुडंट इस्लामिक मुव्हमेंट ऑफ इंडिया अर्थात सिमीचा दहशतवादी आहे. शाकीबला आधीच दोन दहशतवादी हल्ल्यांच्या प्रकरणांमध्ये दोषी ठरवण्यात आलं आहे. या प्रकरणात नाचनला १० वर्षांची शिक्षाही सुनावण्यात आली आहे.
आरोपी शाकीब नाचनने २००२-२००३ मध्ये मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशन, विलेपार्ले आणि मुलुंड इथं बॉम्बस्फोट घडवून आणला होता. या दहशतवादी हल्ल्यामध्ये अनेकांचा जीव गेला होता. २०१७ मध्ये शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शाकीब पुन्हा कट्टरपंथी कारवायांमध्ये सामील झाला होता, असा आरोप आहे. आता पुन्हा एकदा सीमी दहशतवादी संघटनेत प्राण फुंकण्याच्या हालचाली पडघामध्ये सुरू होत्या. याच पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याची माहिती समोर येत आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
June 02, 2025 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
कुख्यात दहशतवादी शाकीब नाचनच्या घरावर ATS ची छापेमारी, 22 पथकांकडून झडती, नेमका डाव काय?