BMC: टँकर माफियाच्या विरोधात लढा दिला, भाजपकडून बक्षीस, गटनेतेपदी निवड झालेले गणेश खणकर कोण?
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. भारतीय जनता पक्षाने आज गटनेतेपदी गणेश खणकर यांची नियुक्ती केली.
मुंबई : बृहन्मुंबई महापालिकेचा महापौर कोण होणार? याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागलेले असताना भारतीय जनता पक्षाने आज गटनेता ठरवला. तीन टर्मचे नगरसेवक, महापालिकेतील अतिशय अभ्यासू नगरसेवक असलेले गणेश खणकर यांच्यावर भारतीय जनता पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांनी गणेश खणकर यांची गटनेतेपदी नियुक्ती करण्यात येत असल्याची घोषणा केली.
मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालानंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. त्याच अनुषंगाने आज भारतीय जनता पक्षा आणि शिवसेनेच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी करण्यात आली. अधोरेखित करण्यासारखी बाब म्हणजे मराठी चेहरा आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या गणेश खणकर यांच्यावर पक्षाने गटनेतेपदाची जबाबदारी सोपवली आहे.
कोण आहेत गणेश खणकर?
गणेश खणकर यांची अतिशय अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळख आहे. महापालिकेच्या कामाचा त्यांना दीर्घ अनुभव आहे. विषयांचे सखोल ज्ञान आणि विविध विषयांची त्यांना जाण आहे. प्रभाग क्रमांक सातमधून विनोद घोसाळकर यांच्या चिरंजीवाला हरवून गणेश खणकर यांनी मुंबई महापालिका निवडणूक जिंकली. गत अनेक वर्षांपासून गणेश खणकर हे भारतीय जनता पक्षाशी एकनिष्ठ आहेत. त्यांच्या पक्षावरील निष्ठेचा पक्षाने सन्मान केल्याचे सांगितले जाते.
advertisement
तसेच गणेश खणकर यांची विशेष ओळख म्हणजे त्यांनी टँकर माफियांविरोधात दिलेला लढा. मुंबई आणि उपनगरांतील टँकर माफियांविरोधात त्यांनी प्रखर लढा दिला होता. टँकर माफियांकडून सुरू असलेली लूट थांबविण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनेही केली.
भारतीय जनता पक्ष संघटना उभारणीत देखील त्यांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय जनता पक्षाचे महामंत्री म्हणूनही त्यांनी काम केले आहे. मुंबई पालिकेत पक्षाचे गटनेते म्हणून त्यांची निवड झाल्याने भाजप नगरसेवकांनी आनंद व्यक्त केला.
advertisement
महापौर कोण? अमित साटम म्हणाले...
मुंबई महापालिकेत भारतीय जनता पक्षाचा महापौर बसेल, हे निश्चित असताना आज मुंबई भाजपाध्यक्ष अमित साटम यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर महायुतीच्या ११८ सदस्यांपैकी एक जण महापौर होईल, असे त्यांनी सांगितले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 02, 2026 5:40 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BMC: टँकर माफियाच्या विरोधात लढा दिला, भाजपकडून बक्षीस, गटनेतेपदी निवड झालेले गणेश खणकर कोण?






