Kirit Somaiya: अशोक चव्हाण यांच्याबद्दल 'तो' प्रश्न, किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Kirit Somaiya Nanded Daura: अशोक चव्हाण यांच्यासंबंधी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर न देताच भाजप नेते किरीट सोमय्या निघून गेले.
नांदेड : माजी मुख्यमंत्री, सध्याचे भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांच्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर उत्तर न देता भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला. नांदेड शहर आणि जिल्ह्यात हा व्हिडीओ समाज माध्यमांवर व्हायरल होतोय.
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या संबंधित एका प्रकरणाच्या चौकशीसाठी तीन वेळा दौरे आयोजित करून ते रद्द करण्यात आले? या प्रश्नावर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उत्तर न देता तेथून जाणे पसंत केले.
नेमकं प्रकरण काय?
माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांच्या साखर कारखान्याने बुलढाणा अर्बन बँकेकडून कर्ज घेतले होते. हे कर्ज नियमबाह्य पद्धतीने घेतल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यावेळी अशोक चव्हाण हे काँग्रेसमध्ये होते. या प्रकरणाच्या चौकशीसाठी किरीट सोमय्या यांनी तीन वेळा नांदेड आणि धर्माबादचा दौरा आखला होता.
advertisement
पण तिन्हीवेळा किरीट सोमय्या यांनी दौरा रद्द केला. त्यानंतर सोमय्या थेट आजच नांदेडला आले. याबाबत प्रश्न विचारला असता किरीट सोमय्या यांनी कोणतेही उत्तर न देता काढता पाय घेतला. कदाचित ज्यांच्यावर आरोप केले, तेच भाजपमध्ये आल्याने त्यावर काय उत्तर देणार, असे त्यांना वाटले असावे, असा टोला विरोधकांनी लगावला.
अशोक चव्हाण यांच्यावर याआधी किरीट सोमय्यांनी अनेक आरोप केले
advertisement
अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना किरीट सोमय्यांनी त्यांच्यावर आरोपांची राळ उडवली होती. आदर्श घोटाळ्यात अशोक चव्हाण यांना जेलवारी झालीच पाहिजे, असे सांगत सोमय्या यांनी त्या प्रकरणाचा पिच्छा पुरवला. तसेच अशोक चव्हाण यांच्या कारखान्याने नियमबाह्य पद्धतीने कर्ज घेतल्याचे सांगत त्याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी करून वातावरण तापवले होते.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
May 15, 2025 8:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Kirit Somaiya: अशोक चव्हाण यांच्याबद्दल 'तो' प्रश्न, किरीट सोमय्या यांनी काढता पाय घेतला