बुलढाणा हादरलं! मित्राच्या बहिणीवर प्रेम जडलं, दोस्तीचा केला भयंकर अंत
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
Crime in Buldhana : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एका तरुणाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला भयावह मृत्यू दिला आहे.
राहुल खंडारे, प्रतिनिधी बुलढाणा: बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर शहरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. इथं एका तरुणाने आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला भयावह मृत्यू दिला आहे. त्याने बहिणीच्या प्रियकराला आधी दारु पाजली आणि त्यानंतर नाकावर रुमाल लावून जीवे मारलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे बहिणीवर प्रेम करणाऱ्या मित्राला मारल्यानंतर आरोपीनं चक्क मित्र चक्कर येऊन पडल्याचा बनाव रचला. पण पोलिसांनी त्याचं बिंग फोडलं आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
प्रवीण अजाबराव संबारे असं हत्या झालेल्या २७ वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर वैभव गोपाल सोनार असं २१ वर्षीय आरोपीचं नाव आहे. दोघंही एकमेकांचे मित्र होते. पण मागील काही दिवसांपासून प्रवीण हा आरोपी वैभवच्या बहिणीच्या प्रेमात पडला होता. दोघांचंही एकमेकांवर प्रेम होतं. मात्र ही बाब वैभवला खटकली. त्याने प्रवीणला फोन करून बहिणीपासून दूर राहण्याची धमकी दिली. तरीही प्रवीणने आरोपीच्या बहिणीसोबतचे प्रेमसंबंध सुरूच ठेवले. याच रागातून आरोपीनं प्रवीणच्या हत्येचा कट रचला.
advertisement
घटनेच्या दिवशी आरोपी वैभव आणि प्रवीण दोघंही बुलढाणा जिल्ह्याच्या मलकापूर शहरातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेजवळील मोकळ्या मैदानात बसले होते. इथं आरोपी वैभवने प्रवीणला दारु पाजली. प्रवीणला नशा चढल्याचं लक्षात आल्यानंतर वैभवने प्रवीणच्या नाक आणि तोंडावर रुमाल ठेवून त्यांची हत्या केली. यानंतर आरोपीनं स्वत: प्रवीणचा भाऊ सचिन यास फोन करून तुमचा भाऊ दारु पिऊन बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली. यानंतर सचिन घटनास्थळी दाखल झाला. त्याने प्रवीणला उपचारासाठी मलकापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. पण डॉक्टरांनी प्रवीणला मृत घोषित केलं. गुरुवारी दुपारी प्रवीणवर अत्यंसंस्कार करण्यात आले.
advertisement
पण भावावर अंत्यसंस्कार केल्यानंतर सचिन याने हत्येच्या आदल्या दिवशी आलेले कॉल रेकॉर्डिंग वारंवार ऐकले. प्रवीण बेशुद्धावस्थेत पडल्याची माहिती ज्या मित्राने दिली होती, त्यानेच प्रवीणची हत्या केली असावी, असा संशय प्रवीणच्या घरच्यांना बळावला. त्यामुळे सचिनसह त्याच्या कुटुंबीयांनी मलकापूर पोलीस ठाण्यात जाऊन फिर्याद दाखल केली. यानंतर पोलिसांनी आरोपी वैभवला ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्याने गुन्ह्याची कबुली दिली. बहिणीवर प्रेमप्रकरण सुरू असल्याच्या कारणातून ही हत्या केल्याचं वैभवने सांगितलं. विशेष म्हणजे आरोपी वैभवने आपला गुन्हा लपवण्यासाठी तो प्रवीणच्या अंत्यसंस्काराला देखील उपस्थित होता. कुटुंबीयांच्या दु:खात सहभागी असल्याचा आवही त्याने आणला होता. मात्र त्याचा बनाव फार काळ टिकू शकला नाही.
view commentsLocation :
Buldana,Maharashtra
First Published :
January 18, 2025 8:12 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बुलढाणा/
बुलढाणा हादरलं! मित्राच्या बहिणीवर प्रेम जडलं, दोस्तीचा केला भयंकर अंत


