Tunnel Autram Ghat: औट्रम घाटातील 5.5 किलोमीटर बोगद्याला केंद्राची मंजुरी, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा पूल
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या औट्रम घाटातील दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. घाटातील वळणदार आणि अवघड रस्त्यांमुळे तासन्तास अडकणाऱ्या वाहनांना आता अवघ्या काही मिनिटांत घाट पार करता येणार आहे.
छत्रपती संभाजीनगर: मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणाऱ्या औट्रम घाटातील दीर्घ प्रतीक्षेला आता पूर्णविराम मिळणार आहे. घाटातील वळणदार आणि अवघड रस्त्यांमुळे तासन्तास अडकणाऱ्या वाहनांना आता केवळ 20 मिनिटांत घाट पार करता येणार आहे. केंद्र सरकारने 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्यास अखेर मंजुरी दिल्याने या स्वप्नवत प्रकल्पाला गती मिळाली आहे.
कन्नड ते चाळीसगाव दरम्यानच्या औट्रम घाटात पूर्वी 11 किलोमीटर लांबीचा बोगदा प्रस्तावित होता. मात्र, त्या भागातील जमीन भुसभुशीत आणि काही ठिकाणी पोकळ असल्याने तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या. परिणामी 5.5 किलोमीटर लांबीच्या बोगद्यास केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या अलाइनमेंट अॅप्रूव्हल समितीने हिरवा कंदील दिला आहे.हा प्रकल्प 2,435 कोटींच्या निधीतून उभारला जाणार असून, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत एप्रिल 2026 पूर्वी शुभारंभ होणार आहे, अशी माहिती माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री खा. डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
advertisement
औट्रम घाटातून जाणाऱ्यांना आतापर्यंत 7-8 तास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत होता. नव्या बोगद्यामुळे ही समस्या पूर्णतः दूर होऊन प्रवास 15 ते 20 मिनिटांत पूर्ण होणार आहे.कराड यांनी या मार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केल्याने सहा पर्यायांपैकी 5.5 किमी बोगद्याचा पर्याय समितीने अंतिम केला. या प्रकल्पामुळे इंधन आणि वेळेत मोठी बचत होणार असून, हा मार्ग देशाच्या उत्तर-दक्षिण भागांना जोडणारा प्रमुख दुवा ठरेल. रेल्वे आणि रस्ते वाहतूक विभागाचा एकत्रित बोगदा करण्याचा प्रस्ताव होता. मात्र तांत्रिक कारणांमुळे तो अमलात आणणे शक्य नसल्याने आता फक्त रस्ते वाहतुकीसाठी स्वतंत्र बोगदा तयार करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालय आपला स्वतंत्र पर्याय पुढे नेणार आहे.
advertisement
प्रकल्पाचे तपशील
- एकूण लांबी : 14.895 किमी
- ग्रीनफील्ड रस्ता : 12.35 किमी
- बोगदा : 5.5 किमी
- वायाडक्ट : 3 किमी
- वनक्षेत्रातून जाणारा भाग : 13 किमी
- वन्यजीव क्षेत्र : 2.2 किमी
- गतीमर्यादा : 100 किमी/तास
- जमीन उपलब्धता : 15.27 हेक्टर
- बांधकाम खर्च : ₹1,705 कोटी
- जीएसटी (18%) : ₹318 कोटी
- एकूण खर्च : ₹2,435 कोटी
कन्नड तालुक्यातील तेलगाव ते चाळीसगाव तालुक्यातील बोथरा गावापर्यंतचा हा मार्ग तयार होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर घाटातील धोकादायक वळणे, प्रदीर्घ प्रवास आणि कोंडी यांना पूर्णविराम मिळणार असून, औट्रम घाट नव्या युगाचा आधुनिक महामार्ग म्हणून ओळखला जाईल.
view commentsLocation :
Maharashtra
First Published :
October 26, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Tunnel Autram Ghat: औट्रम घाटातील 5.5 किलोमीटर बोगद्याला केंद्राची मंजुरी, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा पूल


