Sambhajinagar News : थेट 'सिंघम' स्टाईल कारवाई! तस्करांनी पोलिसांना चिरडण्याचा केला प्रयत्न, पण धाडसाने गेम पलटला
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- local18
- Published by:Tanvi
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar News : छत्रपती संभाजीनगरमध्ये गुन्हे शाखेने थरारक पाठलाग करत 3 हजार नशेच्या सिरपच्या बाटल्या जप्त केल्या. धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारून काच फोडत पोलिसांनी तिघा तस्करांना अटक केली.
छत्रपती संभाजीनगर : शहरात अमली पदार्थांची तस्करी रोखताना गुन्हे शाखेच्या पथकाला शनिवारी 24 जानेवारी मध्यरात्री थेट मृत्यूशी दोन हात करावा लागला. लातूरहून नशेसाठी वापरल्या जाणाऱ्या सिरपच्या तब्बल 3 हजार बाटल्या घेऊन आलेल्या टोळीला पकडण्यासाठी पोलिसांनी केंब्रिज चौक ते गणेश कॉलनी या सुमारे 10 किलोमीटर अंतरावर थरारक पाठलाग केला. या दरम्यान तस्करांनी दोन वेळा पोलिसांच्या अंगावर गाडी घालत ठार मारण्याचा प्रयत्न केला.
मृत्यू समोर असतानाही पोलिसांनी तस्करांना रोखले
या जीवघेण्या पाठलागात गुन्हे शाखेचे अंमलदार दादासाहेब झारगड यांनी धाडसाची कमाल करत धावत्या कारच्या बोनेटवर उडी मारली आणि काच फोडली. काच फुटताच चालकाचे नियंत्रण ढळले, समोरचे दिसेनासे झाले आणि गाडीचा वेग मंदावला. याच क्षणी पोलिसांच्या वाहनांनी चारही बाजूंनी घेराव घालत कार थांबवली आणि 18.78 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांना अटक केली.
advertisement
अटक करण्यात आलेल्यांमध्ये शेख समीर राजसाब (वय 24, लातूर), सय्यद अल्ताफ वहाब (वय 23, उदगीर, लातूर) आणि उमर अब्दुल सहाब (वय 36, लातूर) यांचा समावेश आहे.पदमपुऱ्यातील हनुमान मंदिराच्या तपासकामी शनिवारी पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी शहरात वाहन तपासणीचे आदेश दिले होते.रात्री 9:20 वाजण्याच्या सुमारास केंब्रिज चौकात पीएसआय प्रवीण वाघ यांच्या पथकाला तवेरा (एमएच-12 एचएन-9917) संशयास्पद दिसली. पोलिसांनी इशारा करूनही चालकाने गाडी थांबवली नाही. त्यानंतर ही कार ताशी 100 किमीपेक्षा अधिक वेगाने सावंगी बायपास, नारेगाव, बजरंग चौक मार्गे टीव्ही सेंटरकडे सुसाट निघाली.
advertisement
गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी आयपी मेसजवळील चौकात गाडी आडवी लावत मार्ग रोखण्याचा प्रयत्न केला.मात्र, तस्करांनी वेग कमी केला नाही. पुढे गणेश कॉलनी परिसरात अंमलदार गणेश सागरे यांनी कार थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने थेट धडक दिली. या धडकेत सागरे जखमी झाले.
'टॉपर' निघाला नशेचा तस्कर
या प्रकरणातील धक्कादायक बाब म्हणजे अटकेतील शेख समीर रजवार हा लातूरच्या नामांकित महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. 12 वीमध्ये त्याला 89 टक्के गुण मिळाले होते. मात्र, झटपट श्रीमंतीच्या हव्यासापोटी हा गुणवंत तरुण अमली पदार्थांच्या तस्करीकडे वळला.
advertisement
लातूरच्या मराठवाडा मेडिकलमधून केवळ 40 रुपयांच्या कमिशनसाठी सिरपची प्रत्येक बाटली आणली जात होती. बाजारात 80 रुपयांची बाटली तब्बल 400 रुपयांना विकण्याचे या टोळीचे नियोजन होते.
कार सुसाट धावत असतानाच पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी तातडीने सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स कॉलवर घेतले. आरोपींचे लोकेशन आणि ते ज्या दिशेने जात आहेत ही माहिती रिअल टाइममध्ये शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना देण्यात येत होती.यामुळे काही मिनिटांतच शहरातील विविध चौकांमध्ये नाकेबंदी उभी राहिली आणि तस्करांचे पळून जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्यात यश आले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 26, 2026 10:14 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Sambhajinagar News : थेट 'सिंघम' स्टाईल कारवाई! तस्करांनी पोलिसांना चिरडण्याचा केला प्रयत्न, पण धाडसाने गेम पलटला








