वडील आजारी, आई चहा आणायला गेली अन् 14 वर्षाची लेक रुग्णालयातून गायब, छ. संभाजीनगरात काय घडलं?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: मोबाईल पाहण्यावरून आई रागावल्याने लेकीने टोकाचं पाऊल उचललं. छत्रपती संभाजीनगरातून ती थेट पुण्यात गेली असून बेपत्ता आहे.
छत्रपती संभाजीनगर : रुग्णालयात पतीवर उपचार सुरू असताना, आई फक्त काही मिनिटांसाठी चहा आणायला बाहेर गेली. पण परत आली तेव्हा तिची 14 वर्षांची मुलगी कुठेच दिसत नव्हती. आधीच आजारामुळे त्रस्त असलेल्या कुटुंबावर मुलगी हरवल्याचे नवीन संकट कोसळले आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगावजवळील गावातून हे कुटुंब पतीच्या उपचारांसाठी घाटीत दाखल झाले होते. मुलगी बराच वेळ मोबाइलवर असल्याने आईने तिला समज दिली होती. हा छोटासा वादही मुलीने मनावर घेतला. रागाच्या भरात ती वॉर्डातून बाहेर पडली आणि कोणालाही न सांगता रुग्णालयातून निघून गेली.
advertisement
आईने दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी पतीसाठी चहा आणण्यासाठी ती काही वेळ वॉर्डाबाहेर गेली. तेव्हा मुलगी बाहेरच्या खुर्चीवर बसलेली होती. पण काही मिनिटांत ती परत आली असता, ती खुर्ची रिकामी होती. आजूबाजूला शोध घेतला, रुग्णालयात सर्वत्र पाहिले, पण मुलीचा काहीच पत्ता लागत नव्हता. अखेर गुरुवारी बेगमपुरा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली.
advertisement
तपासात समोर आले की, मुलगी प्रथम संभाजीनगर रेल्वे स्टेशनवर पोहोचली. तिला नांदेडची गाडी मिळाली नाही, मात्र पुण्याला जाणारी ट्रेन मिळाल्याने ती त्यात बसली. पोलिसांनी तिच्या मोबाइलचे लोकेशन तपासले असता ते थेट पुण्यामध्ये आढळले. बेगमपुरा पोलिसांचे निरीक्षक मंगेश जगताप यांनी सांगितले की, मुलगी सुरक्षित मिळावी यासाठी शोधमोहीम सुरू आहे. पुण्यातील स्थानिक पोलिसांनाही याबाबत कळवण्यात आले आहे.
advertisement
पतीच्या उपचारांमुळे आधीच चिंतेत असलेल्या या कुटुंबावर मुलीच्या बेपत्ता होण्याने मोठा मानसिक ताण आला आहे. आई-वडिलांची एकच मागणी आहे की, “ती कुठेही असो, फक्त सुरक्षित सापडावी.”
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Nov 29, 2025 1:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
वडील आजारी, आई चहा आणायला गेली अन् 14 वर्षाची लेक रुग्णालयातून गायब, छ. संभाजीनगरात काय घडलं?









