रुग्णालयात आलेल्या ‘त्या’ महिलांना हेरायचा, मोबाईल नंबर द्यायचा अन्..., कंत्राटी कर्मचाऱ्याचं कांड, छ. संभाजीनगरात खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: संबंधित कुटुंब तयार असल्यास तो त्यांना डॉ. संतोष सोनवणे यांच्या टोळीचा संपर्क क्रमांक देत असल्याचे उघड झाले आहे.
छत्रपती संभाजीनगर : गर्भलिंगनिदान आणि बेकायदेशीर गर्भपात करणाऱ्या टोळीचे धक्कादायक जाळे शहरात उघडकीस आले आहे. या प्रकरणात मनपा रुग्णालयातील कंत्राटी कर्मचाऱ्याचाच सहभाग असल्याचे तपासातून समोर आले आहे. रुग्णालयात तपासणीसाठी येणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती टोळीपर्यंत पोहोचवून त्यांना गर्भलिंगनिदानासाठी प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून शंकर आढाव (वय 27) या कर्मचाऱ्याला एमआयडीसी सिडको पोलिसांनी अटक केली. दरम्यान, या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कुख्यात रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष सोनवणे याच्यासह इतर साथीदार सध्या फरार आहेत.
पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांशी किंवा त्यांच्या कुटुंबीयांशी शंकर आढाव संपर्क साधत असे. त्यानंतर गर्भलिंगनिदानाबाबत त्यांची तयारी आहे का, याची विचारणा केली जात होती. संबंधित कुटुंब तयार असल्यास तो त्यांना डॉ. संतोष सोनवणे यांच्या टोळीचा संपर्क क्रमांक देत असल्याचे उघड झाले आहे.
advertisement
या प्रकरणाचा धागा 7 मार्च रोजी घडलेल्या एका घटनेतून पुढे आला. त्या दिवशी नारेगाव परिसरात 26 वर्षीय विवाहितेचे घरातच गर्भलिंगनिदान करून तिचा गर्भपात करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकारात डॉ. संतोष सोनवणे, जालन्यातील परिचारिका कमळ गोकुळ तिनगोटे आणि मयूरपार्क येथील महालॅब चालक अनिल जाधव (सपकाळ) यांचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. विवाहितेच्या वडिलांना हा प्रकार लक्षात आल्यानंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.
advertisement
या प्रकरणात पोलिसांनी शुक्रवारी विवाहितेचा पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद आणि सासरे फेरोज मन्सूर सय्यद (सर्व रा. बलूच गल्ली, नारेगाव) यांना अटक केली आहे. सध्या या तिघांना पोलिस कोठडीत ठेवण्यात आले असून पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव आणि सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांच्याकडून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
advertisement
या प्रकरणाने समोर आलं कांड
तपासात असेही समोर आले की, आरोपी अरबाज सय्यद आपल्या गर्भवती पत्नीला नियमित तपासणीसाठी नारेगाव येथील मनपा रुग्णालयात घेऊन जात असे. त्याच ठिकाणी कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करणाऱ्या शंकर आढावशी त्याची ओळख झाली. पुढे दोघांमध्ये गर्भलिंगनिदानाबाबत चर्चा झाली. त्यानंतर शंकरनेच पुढाकार घेत अरबाजची ओळख महालॅब चालक अनिल जाधव याच्याशी करून दिली. या संपर्कातून पुढे गर्भलिंगनिदान आणि गर्भपाताचा प्रकार घडवून आणण्यात आला.
advertisement
या प्रकरणात शंकर आढावची भूमिका स्पष्ट झाल्यानंतर सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांनी त्याला अटक केली.
महालॅबमार्फत चाचणी
दरम्यान, शासनाच्या वतीने शासकीय रुग्णालयांमध्ये रक्त तपासणीचे काम महालॅबमार्फत केले जाते. या महालॅबचे कंत्राट अनिल जाधव यांच्या पत्नीच्या नावावर असल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. मात्र प्रत्यक्षात सर्व व्यवहार आणि कामकाज अनिल जाधवच पाहत असल्याचेही उघड झाले आहे.
advertisement
मनपाच्या नारेगाव रुग्णालयातील चाचण्यांचे कामही याच लॅबमार्फत केले जात होते. या संधीचा फायदा घेत अनिल जाधवने शंकर आढावला आपल्या संपर्कात आणल्याचे सांगितले जाते. रुग्णालयात येणाऱ्या गर्भवती महिलांची माहिती गोळा करून ती पुढे देणे, तसेच त्यांच्या कुटुंबीयांना गर्भलिंगनिदानासाठी तयार करण्याचे काम शंकरकडून करून घेतले जात होते. या कामासाठी त्याला टक्केवारीवर पैसे मिळत असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला असून त्याच्या बँक खात्यांची तपासणीही केली जाणार आहे.
advertisement
दरम्यान, या प्रकरणात अटक झाल्यानंतर मुख्य आरोपी डॉ. संतोष सोनवणे, महालॅब चालक अनिल जाधव आणि परिचारिका कमळ तिनगोटे हे फरार झाले आहेत. अनिल जाधवची लॅबही अचानक बंद करण्यात आली आहे. डॉ. सोनवणे यापूर्वी जामिनावर सुटल्यानंतर वारंवार राहते घर बदलत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. त्यामुळे पोलिसांनी फरार आरोपींच्या कुटुंबीयांच्या हालचालींवरही लक्ष ठेवले असून त्यांचा शोध सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 15, 2026 11:10 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
रुग्णालयात आलेल्या ‘त्या’ महिलांना हेरायचा, मोबाईल नंबर द्यायचा अन्..., कंत्राटी कर्मचाऱ्याचं कांड, छ. संभाजीनगरात खळबळ








