ट्रिमरच्या आकाराची लहान मशीन, गोळ्या दिल्या अन् पत्नीला उलटं झोपवलं, मग...पतीच्या कृत्यानं संभाजीनगर हादरलं!
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: या प्रकरणातील विवाहितेचा पती अरबाज याची पोलिसांनी सखोल चौकशी केली. त्यानंतर मोठं रॅकेट पुढं आलं आहे.
छत्रपती संभाजीनगर : आज आपण अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात जगत आहोत. जग झपाट्याने पुढे जात असताना समाजातील काही भागात मात्र अजूनही ‘मुलगाच हवा’ ही मानसिकता बदललेली नाही. या विकृत विचारातूनच छत्रपती संभाजीनगरमध्ये धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. घरातच पोर्टेबल सोनोग्राफी मशीनच्या साहाय्याने गर्भलिंग तपासणी करून गर्भपात केला जात होता. याप्रकरणी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.
एमआयडीसी सिडको पोलिसांनी विवाहितेचा पती अरबाज फेरोज सय्यद, सासू आशिया फेरोज सय्यद आणि सासरे फेरोज मन्सूर सय्यद (रा. बलूच गल्ली, नारेगाव) यांना अटक केली आहे. तपासात मराठवाड्यात अनेक वर्षांपासून सक्रिय असलेल्या रेडिओलॉजिस्ट डॉ. संतोष सोनवणे याचे नावही समोर आले असून त्यानेच या गर्भपाताची सुपारी घेतल्याची माहिती पोलिस तपासात उघड झाली आहे.
advertisement
नारेगावमधील 26 वर्षीय महिला तिसऱ्यांदा गर्भवती होती. कुटुंबीयांना मुलगा हवा असल्याने 27 फेब्रुवारी रोजी तिच्या पतीने दोन पुरुष आणि एका महिलेच्या मदतीने पोर्टेबल सोनोग्राफी मशीन आणून घरीच गर्भलिंग तपासणी केली. तपासणीत गर्भ मुलीचा असल्याचे सांगण्यात आल्यानंतर कुटुंबीयांनी गर्भपात करण्याचा निर्णय घेतला.
advertisement
6 मार्च रोजी कमल गोकुळ तिनगोटे आणि इतर महिलांनी त्या विवाहितेला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. काही वेळानंतर तिला उलटे झोपवून पोटावर दाब देण्यात आला. त्यामुळे ती असह्य वेदनांनी तडफडू लागली. त्यानंतर कमल तिनगोटे हिने अवजारांच्या मदतीने गर्भ बाहेर काढण्याची तयारी सुरू केली होती. त्याच वेळी विवाहितेचे वडील अचानक घरी पोहोचल्याने उपस्थित सर्वजण तेथून पळून गेले. गंभीर अवस्थेत असलेल्या महिलेला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तोपर्यंत तिचा गर्भपात झाल्याचे स्पष्ट झाले.
advertisement
या घटनेनंतर संबंधित कुटुंबीय फरार झाले होते. पोलिस निरीक्षक सोमनाथ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक कैलास लहाने यांनी तपास सुरू करून आरोपींचा शोध घेतला. शुक्रवारी पोलिसांनी तिघांना अटक करून न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 17 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावल्याची माहिती पोलिसांनी दिली.
तपासादरम्यान डॉ. सोनवणे याचे जालना, सिल्लोड आणि बीडपर्यंत गर्भलिंग निदान व गर्भपाताचे जाळे असल्याचे समोर आले आहे. गर्भलिंग तपासणीपासून थेट गर्भपात करण्यापर्यंतची संपूर्ण व्यवस्था ही टोळी करत असल्याची माहिती मिळाली आहे. यासाठी संबंधितांकडून साधारण तीन ते पाच लाख रुपयांपर्यंत रक्कम घेतली जात असल्याचेही उघड झाले आहे. यापूर्वीही अनेक वेळा अटक होऊनही जामिनावर सुटताच ही टोळी पुन्हा सक्रिय होत असल्याने आधीच्या तपासावरही प्रश्न उपस्थित होत आहेत.
advertisement
कोण आहे डॉ. सोनवणे?
मे 2024 मध्ये पुंडलिकनगर पोलिसांनी उघड केलेल्या गर्भपात रॅकेट प्रकरणात सविता थोरात, तिची मुलगी साक्षी तसेच डॉ. सतीश सोनवणे यांच्यासह दहा पेक्षा अधिक जणांना अटक करण्यात आली होती. एमबीबीएस शिक्षण घेतलेल्या सोनवणे यांनी तामिळनाडूमधून रेडिओलॉजीचे शिक्षण घेतले आहे.
जून 2022 मध्ये बीड जिल्ह्यातील गर्भपात रॅकेट प्रकरणात त्याचे नाव प्रथम समोर आले होते. त्या प्रकरणातून जामिनावर सुटल्यानंतर त्याने 2023 मध्ये वाळूज परिसरात पुन्हा रॅकेट सुरू केल्याची माहिती समोर आली आहे. तो ट्रिमरच्या आकाराच्या लहान सोनोग्राफी मशीनच्या मदतीने गर्भतपासणी करत असल्याचे उघड झाले आहे.
advertisement
एवढेच नव्हे तर या बेकायदेशीर कामासाठी इतरांना प्रशिक्षण देण्याचे कामही तो करत असल्याचे तपासात समोर आले आहे. यापूर्वी त्याच्यावर गर्भपातासंबंधी चार गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी सिडको पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून सध्या तो फरार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
या प्रकरणातील विवाहितेचा पती अरबाज याची पोलिसांनी सखोल चौकशी केली. विवाहितेवर उपचार सुरू असलेल्या रुग्णालयातून पोलिसांना जालन्यातील एका खासगी रुग्णालयात परिचारिका म्हणून काम करणाऱ्या कमल तिनगोटे हिचा संपर्क क्रमांक मिळाला. तिच्याशी संपर्क साधल्यानंतर तिने प्राथमिक तपासणी केली आणि तिच्यामार्फत डॉ. सोनवणे यांच्याशी संपर्क साधण्यात आला. 27 फेब्रुवारी रोजी त्यांनी पोर्टेबल मशीनच्या सहाय्याने घरी जाऊन गर्भलिंग तपासणी केली होती.
advertisement
याशिवाय मयूर पार्क येथील ‘फेबो डोमेस्ट महालॅब’मध्ये काम करणाऱ्या अनिल जाधव (सपकाळ) याने विवाहितेच्या रक्ताची तपासणी केली होती. त्यानंतर 7 मार्च रोजी गर्भपात करण्याचे नियोजन करण्यात आले होते. अरबाजच्या चौकशीत ही सर्व नावे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्यांचा गुन्ह्यात समावेश केला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 14, 2026 10:12 AM IST
मराठी बातम्या/क्राइम/
ट्रिमरच्या आकाराची लहान मशीन, गोळ्या दिल्या अन् पत्नीला उलटं झोपवलं, मग...पतीच्या कृत्यानं संभाजीनगर हादरलं!










