छ. संभाजीनगरच्या डॉक्टरचं कांड, ‘पार्सल पाठवा’ कोडवर्ड अन्..., भयंकर रॅकेटचा पर्दाफाश
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: डॉ. सुनील राजपूत आणि नर्स ज्योती पवार हे दोघेही सध्या फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.
छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा परिसरात उघडकीस आलेल्या बेकायदेशीर गर्भलिंगनिदान आणि गर्भपात रॅकेटबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संपूर्ण रॅकेटचा मुख्य सूत्रधार टीव्ही सेंटर भागात राहणारा डॉ. सुनील राजपूत असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. गेल्या 7 ते 8 वर्षांपासून तो हे रॅकेट चालवत असून, यापूर्वीही त्याच्यावर गुन्हे दाखल झाले होते. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा त्याच प्रकारात गुंतत असल्याचे समोर आले असून, यावेळी त्याच्यावर चौथा गुन्हा दाखल होणार आहे.
या रॅकेटमध्ये गर्भपातासाठी ‘पार्सल पाठवा’ हा कोडवर्ड वापरला जात होता. महिलांना पाठवून दिल्यानंतर गर्भ काढून तोच कॅरीबॅगमध्ये देऊन तो नष्ट करण्याची जबाबदारी संबंधित महिलांवर टाकली जात होती. हा प्रकार अत्यंत धक्कादायक आणि अमानवी असल्याचे तपासात उघड झाले आहे.
advertisement
फरार नर्स ज्योती पवारच्या घरावर टाकलेल्या छाप्यात मोठ्या प्रमाणात औषधे आणि सलाइनसह ऑपरेशन थिएटरमध्ये वापरली जाणारी गंभीर साधनेही आढळली. यात गर्भपातासाठी वापरला जाणारा वाकडा चिमटा आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या वर्षा आणि ज्योती यांच्यामध्ये लाखोंचे आर्थिक व्यवहार झाल्याचे समोर आले आहे. वर्षाने गेल्या एका महिन्यातच 3 ते 4 गर्भपात केल्याची माहिती आहे. ज्योतीने इतर महिलांच्या माध्यमातूनही अनेक गर्भपात केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
advertisement
कोडवर्डमध्ये संभाषण
संबंधित टोळी आपले संभाषण लपवण्यासाठी ‘पेशंट पाठवले’, ‘उपचार’ आणि ‘पार्सल पाठवा’ असे कोडवर्ड वापरत होती. तसेच वाय-फायवर चालणारे पोर्टेबल सोनोग्राफी मशीन घेऊन डॉ. राजपूत महिलांच्या घरी जाऊन तपासणी करत होता. सुरुवातीला 3 हजार रुपये घेणारा राजपूत आता एका तपासणीसाठी 15 हजार रुपये वसूल करत असल्याचेही उघड झाले आहे.
सिल्लोडपर्यंत जाळे
या रॅकेटचे जाळे सिल्लोडपर्यंत पसरले असल्याचेही समोर आले आहे. दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात सिल्लोडमधील डॉ. विकास आहेर याची राजपूतशी ओळख झाली आणि त्याला या रॅकेटमध्ये सहभागी करून घेतले. सध्या अटकेत असलेल्या आहेरने 15 ते 20 महिलांची बेकायदेशीर गर्भलिंगनिदान चाचणी केल्याची कबुली दिली आहे.
advertisement
प्रसूती विभागात अनुभव असलेल्या जीएनएम शिक्षित नर्सना या रॅकेटमध्ये सहभागी करण्यात आले होते. त्यात वर्षा जाधव आणि तिची फरार मैत्रीण ज्योती पवार यांचा समावेश आहे. कोणतीही नियमित नोकरी नसतानाही ज्योती पवारने या काळ्या कमाईतून तब्बल 25 लाखांचे रोहाऊस खरेदी केल्याचे समोर आले आहे.
डॉ. सुनील राजपूत आणि नर्स ज्योती पवार हे दोघेही सध्या फरार असून, त्यांना पकडण्यासाठी पोलिसांची दोन विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. त्यांच्या अटकेनंतर या रॅकेटचे आणखी मोठे धागेदोरे उघड होण्याची शक्यता आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Apr 08, 2026 12:32 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
छ. संभाजीनगरच्या डॉक्टरचं कांड, ‘पार्सल पाठवा’ कोडवर्ड अन्..., भयंकर रॅकेटचा पर्दाफाश








