Marriage Fraud: स्टॅम्प पेपरवरचं लग्न पैशापुरतंच टिकलं, शेतकरी तरुणाला कसं फसवलं? 3 लाख घेतले अन्....
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Marriage Fraud: लग्नासाठी स्त्रीधन म्हणून एका युवा शेतकऱ्याकडून 3 लाख रुपये उकळण्यात आले. त्यानंतर रस्त्यातूनच नवरी फरार झाली. छत्रपती संभाजीनगरमधील घटनेनं खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगर: लग्नाचे आमिष दाखवून एका तरुण शेतकऱ्याकडून 'स्त्रीधन' म्हणून तब्बल 3 लाख रुपये उकळण्यात आले. विशेष म्हणजे, दोन्ही पक्षांनी लग्नाची नोंद 100 च्या स्टॅम्प पेपरवर नोटरीद्वारे केली होती. सर्व सोपस्कार झाल्यावर नियोजित वधू नवरदेवाच्या गाडीतून सासरी निघाली, मात्र काही अंतर जाताच एका सुनियोजित कटाद्वारे ती दुसऱ्या गाडीत बसून भररस्त्यातून पसार झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातील एका 29 वर्षीय शेतकरी तरुणाची या टोळीने पद्धतशीर फसवणूक केली.
अहिल्यानगरमधील 29 वर्षीय शेतकरी लग्नासाठी वधूच्या शोधात होता. ही संधी साधून रस्ता कामावरचा सुपरवायझर अरविंद राठोड याने या तरुणाशी संपर्क साधला. "माझ्या गावची मुलगी आहे, तिचे वडील नाहीत, ती आई-भावासोबत राहते आणि कंपनीत नोकरी करते," अशी खोटी माहिती देऊन त्याने तरुणाचा विश्वास संपादन केला. त्याने व्हॉट्सअॅपवर माया शिंदे नावाच्या मुलीचा फोटो पाठवला. तरुणाने तिला पसंत केले. याच वेळी राठोडने लग्नासाठी 'स्त्रीधन' म्हणून थेट 3 लाख रुपये द्यावे लागतील, अशी अट ठेवली. मुलगी आवडल्यामुळे तरुणाने या टोळीवर विश्वास ठेवला आणि पैसे देण्यास तयार झाला.
advertisement
मुलगी बघण्याचा कार्यक्रम
30 नोव्हेंबर रोजी तरुण आपल्या कुटुंबीयांसोबत बजाजनगर येथील मायाच्या घरी पोहोचला. मुलगी बघण्याचा कार्यक्रम झाल्यावर दोन्ही कुटुंबांनी 'पसंती' दर्शवली. त्यानंतर फसवणूक करणाऱ्यांनी तरुणाला विश्वासात घेण्यासाठी एक मोठी चाल खेळली. छत्रपती संभाजीनगर येथील कोर्टात जाऊन त्यांनी 100 च्या स्टॅम्प पेपरवर नवरदेव आणि नवरीच्या संमतीने लग्न करत असल्याची नोटरी करून घेतली. यामुळे तरुणाला आपली फसवणूक होत असल्याचा संशयही आला नाही.
advertisement
नोटरी झाल्यावर, ठरल्याप्रमाणे तरुणाने 3 लाख (रोख आणि यूपीआयद्वारे) मायाची आई सविता शिंदे हिला दिले. पैसे मिळाल्यावर लगेचच आईने, "तुम्ही आजच मुलीला घेऊन जा आणि उद्या गावी लग्न लावा," असा सल्ला दिला. तरुण आणि त्याचे कुटुंबीय नियोजित वधू माया शिंदे हिला घेऊन आपल्या कारमधून घराच्या दिशेने निघाले. काही अंतरावर जाताच, मागून भरधाव वेगाने एक पांढऱ्या रंगाची, विनाक्रमांकाची 'आय-ट्वेंटी' कार आली. त्या कारच्या चालकाने ओव्हरटेक करत त्यांची गाडी रस्त्यात आडवी लावली. या गाडीत चार अज्ञात लोक होते.
advertisement
कार आडवी आली अन्...
कुणाला काही समजण्याच्या आतच, नवरी माया शिंदे कारमधून उतरली आणि काही क्षणांत आडवी लावलेल्या दुसऱ्या कारमध्ये जाऊन बसली. लगेच ती कार वेगाने निघून गेली. हे पाहून गाडीतील सर्वांनाच मोठा धक्का बसला.
धक्कादायक प्रकार घडल्यानंतर तरुणाने लगेच मायाला फोन केला, पण तिचा फोन बंद होता. तो तिच्या बजाजनगर येथील घरी गेला असता, तिथेही कोणीच नव्हते आणि तिची आई सविता शिंदे हिचाही फोन बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच, हताश झालेल्या तरुणाने वाळूज एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली. याप्रकरणी पोलिसांनी अरविंद राठोड, बुड्डा राठोड, सविता शिंदे आणि माया शिंदे यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, टोळीचा शोध सुरू आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 03, 2025 12:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
Marriage Fraud: स्टॅम्प पेपरवरचं लग्न पैशापुरतंच टिकलं, शेतकरी तरुणाला कसं फसवलं? 3 लाख घेतले अन्....









