कपडे घालताना तोंडात पिन धरली अन् ठसका आला, काही कळायच्या आत..., छ. संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं?
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: कपड्यांना पिन लावत असताना ती पिन तोंडात धरलेली असतानाच अचानक ठसका लागला. काही कळायच्या आत पिन गिळली गेली.
छत्रपती संभाजीनगर : घरगुती कामात सहज वापरली जाणारी एक छोटीशी पिन कधी जीवावर बेतू शकते, याचा थरारक अनुभव छत्रपती संभाजीनगरमध्ये आला. क्षणभराचा निष्काळजीपणा आणि अचानक आलेल्या ठसक्यामुळे 18 वर्षीय तरुणीच्या तोंडातील पिन थेट श्वसनलिकेत अडकली आणि तिच्या जीवावर बेतण्याची वेळ आली.
कपड्यांना पिन लावत असताना ती पिन तोंडात धरलेली असतानाच अचानक ठसका लागला. काही कळायच्या आत पिन गिळली गेली आणि ती थेट श्वासनलिकेत अडकली. ही घटना शुक्रवारी घडली. सुरुवातीला त्रास सहन करण्याचा प्रयत्न केला; मात्र शनिवारी श्वास घेण्यास त्रास, तीव्र वेदना आणि भीती वाढल्याने तरुणीला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
advertisement
रुग्णालयात करण्यात आलेल्या एक्स-रे तपासणीत पिन श्वासनलिकेत अडकल्याचे स्पष्ट झाले. घाटी रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. शिवाजी सुक्रे यांच्या मार्गदर्शनाखाली कान-नाक-घसा विभागातील डॉ. शैलेश निकम यांनी ब्राँकोस्कोपीच्या माध्यमातून ही पिन अत्यंत काळजीपूर्वक बाहेर काढली. डॉक्टरांच्या तत्परतेमुळे तरुणीचा जीव वाचवण्यात यश आले.
या उपचार प्रक्रियेत विभागप्रमुख डॉ. सुनील देशमुख, डॉ. प्रशांत केचे, डॉ. सोनाली जटाळे, निवासी डॉक्टर डॉ. ओजस कुलकर्णी, डॉ. अमोल गवई, डॉ. प्रत्युशा, डॉ. ओमप्रकाश, भूलतज्ज्ञ डॉ. गायत्री तडवळकर, डॉ. विद्या लावंड, इन्चार्ज सिस्टर अश्विनी झेंडे आणि ब्रदर राहुल शिंदे यांनी सहकार्य केले.
advertisement
दरम्यान, गेल्या दोन वर्षांत अशा प्रकारे एकूण 10 जणींनी चुकून पिन गिळल्याच्या घटना घाटी रुग्णालयात उपचारासाठी आल्या असून सर्व रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. कपड्यांना लावायची पिन तोंडात न धरता ती बाजूला ठेवावी, असा महत्त्वाचा इशारा डॉ. शैलेश निकम यांनी दिला आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 11:46 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कपडे घालताना तोंडात पिन धरली अन् ठसका आला, काही कळायच्या आत..., छ. संभाजीनगरच्या तरुणीसोबत भयंकर घडलं?







