तुमच्या मुलांना जपा, छ. संभाजीनगरमधील बेपत्ता मुलगा सापडला, भिकाऱ्यांचं धक्कादायक कनेक्शन समोर
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: CCTV फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान संबंधित फकीर आणि महिलेनं मुलाला..
छत्रपती संभाजीनगर: मुलं किंवा मुली बेपत्ता झाल्याच्या घटना आपण ऐकल्या असतील. परंतु, छत्रपती संभाजीनगरातून एक धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. खुलताबाद शहरातील जुन्या बसस्थानक परिसरातून 11 वर्षीय आदिल शहा हा मुलगा गायब झाला होता. खुलताबाद पोलिसांनी अवघ्या पाच दिवसांत त्याचा शोध घेतला. भीक मागण्याच्या उद्देशाने त्याला पळवून नेल्याचे पुढे आले असून एका फकीरासह त्याच्यासोबत असलेल्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले. मंगळवारी (दि. 6) मुलाला त्याच्या आई-वडिलांच्या स्वाधीन केले. तेव्हा पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले.
गुरुवारी (दि. 1) खुलताबाद येथील जुने बसस्थानक परिसरातून आदिल अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबीयांनी सर्वत्र शोध घेतला; मात्र तो आढळून न आल्याने रविवारी (दि. 4) अखेर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार प्राप्त होताच पोलिस निरीक्षक धनंजय फराटे यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी तपासाची दिशा निश्चित केली. तपासादरम्यान संबंधित फकीर आणि महिलेनं मुलाला कन्नडमार्गे चाळीसगाव येथील उरुसात नेल्याचे उघड झाले. या माहितीच्या आधारे कन्नड पोलिसांनी संशयित दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत मुलगा चाळीसगावमध्ये असल्याची खात्री झाल्यानंतर खुलताबाद पोलिसांचे पथक तातडीने चाळीसगावकडे रवाना झाले. तेथे पोलिसांनी मुलाला सुखरूप ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. त्यानंतर आदिलला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
advertisement
दरम्यान, ही संपूर्ण कारवाई बीट जमादार जाकेर शेख, सिद्धार्थ सदावर्ते, किशोर गवळी आणि फिरोज पठाण यांनी यशस्वीरीत्या पार पाडली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल खुलताबादचे नगराध्यक्ष आमेर पटेल यांनी सायंकाळी सहा वाजता पोलिस निरीक्षक धनंजय फराटे व त्यांच्या पथकाचा विशेष सत्कार केला. या प्रकरणी दानिश अय्युब शहा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संबंधित फकीर आणि महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 07, 2026 11:32 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
तुमच्या मुलांना जपा, छ. संभाजीनगरमधील बेपत्ता मुलगा सापडला, भिकाऱ्यांचं धक्कादायक कनेक्शन समोर








