अडीच तासांचा प्रवास 60 मिनिटांत, छ. संभाजीनगरात होतोय रिंग रोड, गेमचेंजर प्लॅन कसा?
- Reported by:Ravi Shivaji Shikare
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrpati Sambhajinagar: शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या औद्योगिक पट्ट्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी या रिंग रोडची गरज होती.
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर परिसरातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या प्रमुख औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या प्रस्तावित रिंग रोडचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्य शासनाने या रिंग रोडसाठी सर्वेक्षण तसेच भूसंपादन प्रक्रियेला हिरवा कंदील दिला असून हा रस्ता तब्बल 6 पदरी ग्रीनफील्ड स्वरूपाचा असणार आहे. सुमारे 67 किलोमीटर लांबीच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे वाहतूक कोंडी कमी होऊन औद्योगिक दळणवळण अधिक वेगवान होण्याची अपेक्षा आहे.
या रिंग रोडचा प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभागाकडून शासनाकडे सादर करण्यात आला होता. शासनाने त्यावर तातडीने सहमती दर्शवत सर्वेक्षण आणि भूसंपादनास मंजुरी दिली आहे. सध्या सर्वेक्षण करणाऱ्या कंपनीची निवड करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवण्याची फाइल मंजुरीसाठी दाखल करण्यात आली आहे. लवकरच ही मंजुरी मिळाल्यानंतर प्रत्यक्ष निविदा प्रक्रिया सुरू होणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभाग अधीक्षक अभियंता एस.एस. भगत यांनी सांगितले.
advertisement
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज ही औद्योगिक विकासाची प्रमुख केंद्रे मानली जातात. ऑरिक सिटीअंतर्गत बिडकीन आणि शेंद्रा, तर एमआयडीसीअंतर्गत वाळूज, चिकलठाणा आणि परिसरातील इतर भागांचा समावेश होतो. विशेषतः बिडकीन परिसरात सरकारने सुमारे 8 हजार एकर जमीन संपादित केली असून येथे मोठ्या उद्योगांची पावले वळत आहेत. एथर एनर्जी, टोयोटा किर्लोस्कर, जेएसडब्ल्यू ग्रीन मोबिलिटी आणि लुब्रीझोलसारख्या नामांकित कंपन्यांनी गुंतवणुकीची घोषणा केली आहे. यामुळे जवळपास 1261 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार आहे, त्यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत.
advertisement
रिंग रोडसाठी 60 मीटर रुंद जमीन आवश्यक
करमाड-एकोडपासून सुरू होणारा आणि पाचोड मार्गे थेट ढोरेगावपर्यंत जाणारा प्रस्तावित रिंग रोड शहरासाठी दिलासादायक ठरणार आहे. हा मार्ग कार्यान्वित झाल्यास अवजड वाहतूक थेट शहराबाहेरून वळवता येणार असून, छत्रपती संभाजीनगरमधील दैनंदिन वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे. यामुळे प्रवासाचा वेळही लक्षणीयरीत्या वाचणार असून उद्योगांसाठी जलद दळणवळणाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे.
advertisement
शेंद्रा, बिडकीन आणि वाळूज या औद्योगिक पट्ट्यांना एकमेकांशी जोडण्यासाठी या रिंग रोडची गरज दीर्घकाळ जाणवत होती. त्याची दखल घेत राज्य शासनाने अखेर या महत्त्वाच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. प्रस्तावित रस्त्यासाठी सुमारे 60 मीटर रुंदीची जमीन संपादित केली जाणार असून, ग्रीनफील्ड पद्धतीने हा रस्ता विकसित केला जाणार आहे. या प्रकल्पामुळे औद्योगिक वाहतूक सुरळीत होण्यासोबतच शहराचा सर्वांगीण विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
advertisement
भूसंपादन निधीला मान्यता
करमाड ते बिडकीन मार्गावरील 32 किमी आणि बिडकीन ते ढोरेगाव 35.8 किमी रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक निधी मंजूर करण्यात आला आहे. करमाड-बिडकीन मार्गासाठी 315 कोटी रुपये तर बिडकीन-ढोरेगाव मार्गासाठी 430 कोटी रुपये निधी दिला जाणार आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jan 20, 2026 9:56 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
अडीच तासांचा प्रवास 60 मिनिटांत, छ. संभाजीनगरात होतोय रिंग रोड, गेमचेंजर प्लॅन कसा?









