वेबसिरीज, सिनेमे अन् डायरीतील कार्टून..., CID पेक्षा डेंजर ‘मर्डर मिस्ट्री’, 1521 दिवसांनी अल्पवयीन आरोपीला जन्मठेप!
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: छत्रपती संभाजीनगरमधील प्राध्यापकाच्या हत्येप्रकरणाचा निकाल 1521 दिवसांनी जाहीर झाला. याप्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा झाली.
छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरात खळबळ उडवून देणाऱ्या प्रा. डॉ. राजन हरिभाऊ शिंदे (45) यांच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने आरोपीला जन्मठेप सुनावली. घटनावेळी आरोपी अल्पवयीन असला तरी, त्याने अत्यंत योजनाबद्ध आणि निर्दयी पद्धतीने खून केल्याचे पोलिसांनी न्यायालयासमोर ठोस पुराव्यांसह सिद्ध केले. त्यामुळे सुधारगृहात असलेल्या आरोपीची पुढील रवानगी हरसूल कारागृहात करण्यात आली.
11 ऑक्टोबर 2021 रोजी घडलेल्या या खुनाने राज्यभरात चर्चेला तोंड दिले होते. गुन्ह्यानंतर पहिल्या नऊ दिवसांत हत्येचे कोणतेही धागेदोरे सापडत नव्हते. डंबेल आणि चाकूचा वापर करून केलेल्या खुनामागे आरोपीने मागील काही महिन्यांपासून मोठे ‘होमवर्क’ केले असल्याचे तपासात समोर आले. कायदेशीर तरतुदींचा अभ्यास, इंटरनेटवरील हत्या पद्धतींची माहिती, भयकथांच्या पुस्तकांचा अभ्यास, स्वतः काढलेले कार्टून आणि मर्डर मिस्ट्री वेबसिरीज या सर्वांचा परिणाम त्याच्या योजनेत दिसून आला. पोलिसांनी तपासात सातत्य ठेवत गोळा केलेल्या डिजिटल पुराव्यांमुळे अखेर आरोपीच खरा मारेकरी असल्याचे निश्चित झाले.
advertisement
तपासात उघड झाले की, आरोपीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर खूनाशी संबंधित वेबसीरिज आणि सिनेमे पाहिले होते. ‘खून कसा करावा’, ‘पुरावे कसे नाहीसे करावे’ यांसारख्या विषयांची सर्च हिस्टरी त्याच्या ब्राउझरमध्ये आढळली. ही माहिती पोलिसांच्या नजरेस पडू नये म्हणून त्याने ‘टीओआर’ सारखा ब्राउझरही वापरला होता. मात्र, त्याच डिजिटल हालचाली शेवटी त्याच्याविरुद्ध ठोस पुरावे ठरल्या.
advertisement
न्यायालयाचे निर्देश
आरोपी 18 ऑक्टोबर 2021 पासून निरीक्षण गृहात आहे; आधीची शिक्षा कालावधीत समाविष्ट मानली जाईल.
कारागृहात असताना त्याला शिक्षण, कौशल्यविकास, समुपदेशन आणि मानसोपचाराची सोय करण्यात यावी.
जिल्हा बाल संरक्षण संस्थेने आरोपीच्या पुनर्वसनाचा सविस्तर अहवाल तयार करून दरवर्षी न्यायालयात सादर करावा.
शिक्षेविरुद्ध 60 दिवसांच्या आत उच्च न्यायालयात अपील करता येईल.
यांनी मांडली बाजू
तत्कालीन पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक अविनाश आघाव यांच्यासह गीता बागवडे, गौतम पातारे, ब्रह्मा गिरी, मनोज शिंदे, दत्ता शेळके, बाळासाहेब आहेर आणि सुनील बडगुजर यांनी तपास पूर्ण केला. सरकारी पक्षाची बाजू मुख्य सरकारी वकील अविनाश देशमुख यांनी प्रभावीपणे मांडली.
advertisement
महिलेचा प्रयत्न फसला
view commentsया प्रकरणात एका महिलेकडून आरोपीला वाचवण्याचा प्रयत्न सुनावणीदरम्यान दिसून आला. मात्र, तिचा क्रिमिनल प्रोसिजर कोड कलम 164 अंतर्गत नोंदलेला जबाब न्यायालयात अत्यंत निर्णायक ठरला. तत्कालीक सत्र न्यायाधीश ए. एस. वैरागडे यांनी तिला फितूर घोषित केले होते, ज्यामुळे तपासाला अधिक बळ मिळाले. 1521 दिवस चाललेल्या गुंतागुंतीच्या तपासानंतर अखेर न्यायालयाने विधिसंघर्षग्रस्त मुलाला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सुधारगृहातून त्याची तातडीने कारागृहात रवानगी करून प्रकरणाची महत्त्वपूर्ण सांगता झाली.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
December 11, 2025 1:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
वेबसिरीज, सिनेमे अन् डायरीतील कार्टून..., CID पेक्षा डेंजर ‘मर्डर मिस्ट्री’, 1521 दिवसांनी अल्पवयीन आरोपीला जन्मठेप!










