पालकांनो सावधान! 12 महिन्याच्या बाळानं जेली बॉल गिळला, आतड्यात फुगला अन् पुढे जे घडलं...
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: पालकांचं थोडंसं दूर्लक्ष बाळाच्या जीवावर बेतू शकतं. असाच काहीसा प्रकार जालन्यातील 12 महिन्यांच्या चिमुकल्यासोबत घडला.
छत्रपती संभाजीनगर: जालन्यातील एका 12 महिन्यांच्या बाळाने (नाव बदलले) खेळताना मोहरीच्या दाण्याएवढा असलेला रंगीत 'जेली बॉल' गिळला आणि त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला होता. पालकांच्या नकळत ही घटना घडली. मात्र, शरीरात गेल्यावर पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे हा छोटा बॉल केवळ तीन दिवसांतच फुगून 3 सेंटीमीटरचा झाला आणि तो थेट लहान आतड्यांमध्ये अडकला. यामुळे बाळाची पचनक्रिया पूर्णपणे थांबली.
आतड्यात अडथळा निर्माण झाल्यामुळे बाळाला हिरव्या-पिवळ्या रंगाच्या उलट्या सुरू झाल्या आणि त्याची प्रकृती खूपच खालावली. श्वास थांबण्याची वेळ आल्याने घाबरलेल्या पालकांनी तातडीने त्याला बालरोगतज्ज्ञ डॉ. राजगोपाल तोतला यांच्याकडे आणले. बाळाचे पोट नेहमीपेक्षा चार पटीने फुगले होते आणि ते अत्यवस्थ होते.
advertisement
डॉ. तोतला यांनी त्वरित प्राथमिक चाचण्या करून तातडीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. डिहायड्रेशन कमी करण्यासाठी सलाईन व औषधे देऊन बाळाला स्थिर करण्यात आले. दुसऱ्या दिवशी पोट उघडल्यावर त्यांना लहान आतड्यांमध्ये सूज आणि अडथळा दिसला. संपूर्ण 24 फुटांची आतडी तपासल्यावर एका विशिष्ट ठिकाणी काहीतरी अडकल्याचे लक्षात आले.
अडीच तासांच्या अथक शस्त्रक्रियेनंतर, अडकलेल्या जागेवर चिरा मारून 3 सेंटीमीटरचा फुगलेला जेली बॉल यशस्वीपणे बाहेर काढण्यात आला. बॉल बाहेर पडताच साचलेले मलही बाहेर पडले. शस्त्रक्रियेनंतर बाळाला नऊ टाके घालण्यात आले आणि तीन दिवस अतिदक्षता विभागात (ICU) ठेवण्यात आले. डॉ. तोतला यांना सहयोगी शल्यचिकित्सक डॉ. अर्जुन पवार आणि भूलतज्ज्ञ डॉ. श्रीगोपाल भट्टड यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
advertisement
आमच्याकडून चूक झाली...
बाळाच्या वडिलांनी भावूक प्रतिक्रिया देताना सांगितले, "आमचं बाळ गमावतो की काय अशी स्थिती होती. डॉक्टरांनी आमच्या बाळाला जीवदान दिले. आमच्याकडून मोठी चूक झाली, पण इतर पालकांनी यातून धडा घेऊन मुलांना जेली बॉलपासून पूर्णपणे लांब ठेवावे आणि मुलांवर कडक लक्ष ठेवावे."
मोठी रिस्क होती...
"ज्येष्ठ बालशल्यचिकित्सक डॉ. तोतला यांनी सांगितले की, "बाळाने गिळलेल्या जेली बॉलला आतड्यांमध्ये पाण्याचा संपर्क मिळताच तो फुगला आणि अडथळा निर्माण झाला. त्यामुळे अन्नपचन थांबून उलट्यांतून अन्न बाहेर पडत होते. बाळाची स्थिती पाहून शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचे होते आणि ही मोठी 'रिस्क' होती, पण यशस्वी झाली."
advertisement
या घटनेतून पालकांसाठी धडा
लहान मुलांना खेळण्यासाठी जेली बॉल (पाण्यात फुगणारे रंगीत बॉल) अजिबात देऊ नका. मुलाचे पोट अचानक फुगल्यास किंवा उलट्या होत असल्यास वेळ न घालवता त्वरित बालशल्यचिकित्सकांचा सल्ला घ्या.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 10, 2025 10:09 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
पालकांनो सावधान! 12 महिन्याच्या बाळानं जेली बॉल गिळला, आतड्यात फुगला अन् पुढे जे घडलं...









