कुत्र्यापासून बचाव करताना तरुण पडला विहिरीत, 3 दिवसांनी मिळाली मदत, नेमकं काय घडलं? Video
- Published by:Mohan Najan
- Reported by:Apurva Pradip Talnikar
Last Updated:
तिथं असलेली दोरी त्याने घट्ट धरून ठेवली. तब्बल त्याला तीन दिवसानंतर मदत मिळाली आणि तो सुखरूप विहिरीच्या बाहेर आला.
अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : देव तारी त्याला कोण मारी, ही म्हण आपण ऐकलीच असेल. या म्हणीचा प्रत्यय एका तरुणाला आलेला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील पिशोर इथं एक तरुण विहिरीत पडला, त्या ठिकाणी कोणीच गेलं नसल्यानं त्याला मदत मिळाली नाही. मात्र तिथं असलेली दोरी त्याने घट्ट धरून ठेवली. तब्बल त्याला तीन दिवसानंतर मदत मिळाली आणि तो सुखरूप विहिरीच्या बाहेर आला. संदीप घटकवडे असं या तरुणाचं नाव आहे.
advertisement
संदीप हा मूळचा जालना जिल्ह्यातील तीस वर्षीय तरुण आहे. संदीप काही कामानिमित्त पिशोर इथं नातेवाईकाकडे आला होता. गावात येताच त्याच्या मागं मोकाट कुत्रे लागले. त्यांच्यापासून बचाव करण्यासाठी तो धावला, मात्र एका मोकळ्या जागेवरील विहिरीत तो पडला. जीव वाचवण्यासाठी त्याने धडपड केली, सर्व प्रयत्न हे निष्फळ ठरले. मात्र तिथं असलेली दोरी त्याने पकडून ठेवली आणि मदतीसाठी प्रतीक्षा सुरू केली. कोणी आल्याची थोडी जरी चाहूल लागली, तरी तो आवाज देत होता. मात्र मदत मिळाली नाही. एक - दोन नाही, तर तब्बल तीन दिवस प्रतीक्षा केल्यानंतर अखेर त्याचा आवाज दोघांनी ऐकला आणि मदत मिळाली.
advertisement
विहीर अशा ठिकाणी होती की ज्या ठिकाणी कोणाचाही वावर जास्त नव्हता. विहिरीतील एका दोरीला त्याने पकडून ठेवलं. काही मुलं मोहळ शोधण्यासाठी त्या भागात गेले. बाहेर होणारी हालचाल लक्षात येताच संदीपने आवाज दिला. त्या मुलांनी तो आवाज ऐकला आणि पोलिसांना माहिती दिली. पिशोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी नागवे यांनी काही कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवलं.
advertisement
तोपर्यंत स्थानिक नागरिकांनी मदत कार्याला सुरुवात केली. दुसऱ्या दोरीला टायर बांधून विहिरीत सोडण्यात आला. त्या टायरमध्ये बसल्यावर पोलीस आणि नागरिकांनी संदीपला बाहेर ओढलं. तीन दिवस अन्न पाण्याशिवाय राहिल्याने तो अशक्त झाला. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याची प्रकृती चांगली असल्याने त्याला प्राथमिक उपचार करून सोडण्यात आलं. अखेर संदीप आपल्या घरी जालन्याकडं रवाना झाला.
advertisement
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 31, 2025 3:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
कुत्र्यापासून बचाव करताना तरुण पडला विहिरीत, 3 दिवसांनी मिळाली मदत, नेमकं काय घडलं? Video






