धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा; गळ्याला कोयते लावून 9 लाख लुटले
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर- धुळे महामार्गावरील चोराखळी येथील कला केंद्रावर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली आहे.
बालाजी निरफळ, प्रतिनिधी धाराशिव: सोलापूर - धुळे महामार्गावरील चोराखळी येथील कला केंद्रावर पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास सशस्त्र दरोड्याची थरारक घटना घडली आहे. कालिका सांस्कृतिक कलाकेंद्र चालकाच्या घरी सहा जणांनी घुसखोरी करून पिस्तूल व लोखंडी सुरा दाखवत तब्बल ९लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.या प्रकरणी येरमाळा पोलीस स्टेशन येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
चोराखळी येथील रहिवासी आणि कालिका सांस्कृतिक लोकनाट्य कलाकेंद्राच्या संचालिका निर्मला मोहन जाधव या चोराखळी येथे धाराशिव साखर कारखान्याजवळ राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ लगत असलेल्या त्यांच्या कलाकेंद्राच्या दुसऱ्या मजल्यावर कुटुंबासह वास्तव्यास आहेत. शिवाय रेखा किशोर शिंदे (रा. टाकळी, जि. परभणी) व शिवम उर्फ गळ्या गंगावणे हेही राहत होते.
निर्मला जाधव यांनी येरमाळा पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, मागील काही महिन्यांपासून तेरखेडा येथील सचिन उर्फ प्रशांत बापू पवार आणि महादेव विठ्ठल घुले यांचा कलाकेंद्रावर येजा करत होता. आर्थिक व्यवहारातून वाद निर्माण झाल्यानंतर सचिन पवार याने घरफोडीची धमकी दिल्याचंही तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने चोराखळीतील कलाकेंद्र सील झाल्यानंतर निर्मला जाधव यांनी बार्शी (जि. सोलापूर) येथे भाड्याने दुसरे कलाकेंद्र सुरू केले होते.
advertisement
रविवारी ता. २ पहाटे नेहमीप्रमाणे बार्शी येथील कलाकेंद्र बंद करून पहाटे साडेतीनच्या सुमारास निर्मला जाधव, रेखा शिंदे, शिवम उर्फ गळ्या आणि चालक शशिकांत मुंडे हे इनोव्हा गाडीने चोराखळी येथे परतत असताना एका चारचाकी वाहनाने पाठलाग केल्याचं त्यांना जाणवले. पहाटे साडेपाचच्या सुमारास घराचे दार उघडे असतानाच तोंडाला अर्धवट कापड बांधलेले सहा इसम घरात शिरले.त्यापैकी दोघांनी शिवम गंगावणे याला जमिनीवर दाबून धरले, एकाने निर्मला जाधव यांच्या डोक्याला पिस्तूल लावले, तर दुसऱ्याने रेखा शिंदे यांच्या गळ्याला लोखंडी सुरा लावला. आरडाओरड केल्याने आरोपींनी तिघांच्या डोळ्यांत चटणी टाकून जीवे मारण्याची धमकी दिली. यानंतर आरोपींनी निर्मला जाधव, रेखा शिंदे यांच्या अंगावरील सुमारे १२१.६०० ग्रॅम वजनाचे अंदाजे ६ लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, चार मोबाईल फोन (किंमत सुमारे ३ लाख ४९ हजार रुपये) तसेच सीसीटीव्ही डीव्हीआर असा एकूण ९ लाख ५१ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
advertisement
दरोड्यावेळी समोर उभा असलेला एक आरोपी सचिन उर्फ प्रशांत पवार असल्याचे ओळखूनही जीवाला धोका असल्याने त्यांनी तात्काळ ओळख उघड केली नाही, असं तक्रारीत नमूद आहे. या दरोड्यात सचिन पवारसह पाच अज्ञात आरोपींचा तसेच महादेव घुले याचा सहभाग असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला सदरील प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचं काम रात्री उशिरापर्यंत सुरू होतं.
Location :
Osmanabad,Maharashtra
First Published :
Mar 03, 2026 8:00 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धाराशिवमध्ये कलाकेंद्र चालकाच्या घरात सशस्त्र दरोडा; गळ्याला कोयते लावून 9 लाख लुटले









