सायक्लोनिक सर्क्युलेशनचा मोठा परिणाम, विकेण्डला हवामानात होणार मोठा बदल
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
उत्तर भारतातील थंडीची लाट, दाट धुके आणि बदलत्या हवामानामुळे महाराष्ट्रातील गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे थंडी वाढणार असून वाहतूक आणि प्रवासावर परिणाम होऊ शकतो.
ख्रिसमस संपल्यानंतर आता संपूर्ण उत्तर आणि ईशान्य भारतात हवामानाने रौद्र रूप धारण केले आहे. भारतीय हवामान विभागाने जारी केलेल्या ताज्या अहवालानुसार, देशाच्या मोठ्या भागात विशम शीत दिवस आणि दाट धुक्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतात वाहणाऱ्या या अतिशित लहरींचा आणि बदलत्या हवामान प्रणालीचा अप्रत्यक्ष परिणाम महाराष्ट्राच्या हवामानावरही होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पंजाब, हरियाणा, चंदीगड आणि राजस्थानमध्ये २६ ते ३० डिसेंबर दरम्यान भीषण थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये २९ डिसेंबरपर्यंत दाट धुके राहील, ज्यामुळे दृश्यमानता शून्यावर येऊ शकते. महाराष्ट्राच्या उत्तरेकडील सीमेवरील गावांमध्ये थंडी वाढणार आहे. हवामान विभागाने देशाच्या इतर भागात किमान तापमानात खूप मोठ्या बदलाची शक्यता वर्तवलेली नसली, तरी छत्तीसगडमध्ये पुढील ३ दिवसांत तापमान १ ते २ अंशांनी घसरण्याचा अंदाज आहे.
advertisement
छत्तीसगड राज्य महाराष्ट्राच्या सीमेला लागून असल्याने, याचा थेट परिणाम पूर्व महाराष्ट्र म्हणजेच विदर्भातील जिल्ह्यांवर (गडचिरोली, गोंदिया, नागपूर) पाहायला मिळू शकतो. या भागात येणाऱ्या दिवसांत कडाक्याची थंडी जाणवू शकते. दक्षिण-पूर्व अरबी समुद्र आणि केरळ किनारपट्टीजवळ एक चक्राकार वाऱ्यांची स्थिती सक्रिय आहे. तामिळनाडू किनारपट्टीवरही दुसरी एक हवामान प्रणाली तयार झाली आहे. या प्रणालींमुळे दक्षिण भारतातून येणारी आर्द्रता आणि उत्तरेकडून येणारे थंड वारे यांच्या मिलाफामुळे महाराष्ट्राच्या काही भागांत ढगाळ वातावरण राहण्याची आणि किमान तापमानात अंशतः घट होण्याची शक्यता आहे.
advertisement
उत्तर भारतातील दाट धुक्यामुळे विमान सेवा, रेल्वे आणि महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होण्याची भीती आहे. दिल्ली आणि उत्तर भारताकडे जाणाऱ्या अनेक गाड्या आणि विमानांना उशीर होऊ शकतो, ज्याचा थेट फटका महाराष्ट्रातून उत्तर भारतात जाणाऱ्या प्रवाशांना बसेल. कमी दृश्यमानतेमुळे अपघातांचा धोका वाढतो, त्यामुळे हवामान विभागाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. येत्या २७ डिसेंबरपासून हिमालयाच्या भागात एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स धडकणार आहे. यामुळे डोंगराळ राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी होईल. याचा परिणाम म्हणून वर्षाच्या अखेरीस महाराष्ट्रासह मध्य भारतात थंडीची आणखी एक मोठी लाट येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 7:51 AM IST









