ठाण्यात पुन्हा वाहन 'जळीतकांड'! पहाटे 3 वाजता घडलं भयंकर, घटनास्थळावरचे PHOTO
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
ठाणेच्या सिंधी कॉलनीत मध्यरात्री तीन चारचाकी गाड्यांना भीषण आग लागली. कोपरी पोलीस जाणीवपूर्वक जळीतकांडाचा संशय तपासत असून परिसरात भीतीचे वातावरण आहे.
अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे: ठाणे शहरात पुन्हा एकदा गाड्या जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोपरी परिसरातील सिंधी कॉलनीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास पार्किंगमध्ये लावलेल्या तीन चारचाकी वाहनांना अचानक भीषण आग लागली. या आगीत तिन्ही गाड्या जळून खाक झाल्या असून, ही आग लागली की लावली? याबाबत आता परिसरात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, कोपरी येथील सिंधी कॉलनी परिसरात रहिवाशांनी दररोजप्रमाणे आपली वाहने पार्क केली होती. मध्यरात्री गाड्यांमधून अचानक धूर निघू लागला आणि काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. एका गाडीला लागलेली आग शेजारी उभ्या असलेल्या इतर दोन गाड्यांपर्यंत पसरली. आगीच्या ज्वाळा पाहून स्थानिक नागरिक घराबाहेर आले आणि त्यांनी तातडीने अग्निशमन दलाला पाचारण केले.
advertisement
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. गाड्यांमध्ये इंधन आणि इतर ज्वालाग्राही पदार्थ असल्याने आग वेगाने पसरत होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि मोठी दुर्घटना टाळली. तरीही या आगीत तिन्ही चारचाकी गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले असून त्या जळून पूर्णपणे कोळसा झाल्या आहेत.
advertisement
advertisement
परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सध्या सुरू असून, मध्यरात्री संशयास्पद हालचाली दिसल्या आहेत का, याचा पोलीस शोध घेत आहेत. जर ही आग लावली असेल, तर त्यामागे वैयक्तिक वैमनस्य आहे की शहरात दहशत पसरवण्याचा प्रयत्न, या दिशेने कोपरी पोलीस विशेष तपास करत आहेत. या घटनेमुळे सिंधी कॉलनी परिसरातील वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.











