'मी महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलोय..'; कामगाराने रस्त्यावर सापडलेलं सोनं केलं परत, बक्षीसही नाकारलं
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
काम आटोपून दुकानाबाहेर पडत असताना, दुचाकीची चावी काढताना त्यांच्या खिशात असलेली सोन्याची अंगठी नकळत रस्त्यावर पडली. भोसले यांना हे लक्षात आले नाही आणि ते निघून गेले.
बारामती : "मी महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलो आहे, सोन्याच्या मोहासाठी नाही," अशा शब्दांत आपल्या उच्च संस्कारांची प्रचिती देत एका परप्रांतीय कामगाराने प्रामाणिकपणाचा नवा आदर्श घालून दिला आहे. केशकर्तनालयाबाहेर सापडलेली सुमारे सव्वा तोळ्याची सोन्याची अंगठी मूळ मालकाला परत करून या तरुणाने सर्वांची मने जिंकली आहेत.
नेमकी घटना काय?
रिपाइं (आठवले गट) चे तालुका युवकाध्यक्ष विश्वास भोसले हे बुधवारी सकाळी माळेगाव येथील एका सलूनमध्ये आले होते. काम आटोपून दुकानाबाहेर पडत असताना, दुचाकीची चावी काढताना त्यांच्या खिशात असलेली सोन्याची अंगठी नकळत रस्त्यावर पडली. भोसले यांना हे लक्षात आले नाही आणि ते निघून गेले.
advertisement
त्याच दुकानात काम करणारे मूळचे लखनऊ (उत्तर प्रदेश) येथील राजू सलमानी यांना ही अंगठी रस्त्यावर चमकताना दिसली. ती अंगठी उचलून त्यांनी कोणताही विचार न करता लगेच दुकानाचे मालक जालिंदर दत्तात्रय जाधव यांच्याकडे सुपूर्द केली. काही वेळाने अंगठी हरवल्याचे लक्षात येताच विश्वास भोसले धावत पुन्हा सलूनमध्ये आले. जालिंदर जाधव यांनी खात्री पटवून ती सोन्याची अंगठी भोसले यांच्या स्वाधीन केली.
advertisement
भोसले यांनी आनंदाच्या भरात राजू सलमानी यांना रोख रकमेचे बक्षीस देण्याचा प्रयत्न केला. मात्र राजू यांनी ते नम्रपणे नाकारले. "माझ्या आई-वडिलांनी मला प्रामाणिकपणाचे संस्कार दिले आहेत, अंगठी परत मिळाल्याचे समाधान माझ्यासाठी मोठे आहे," असे राजू यांनी यावेळी सांगितले.
यावेळी प्रतीक जाधव, सनी काळे आणि इतर नागरिक उपस्थित होते. एका परप्रांतीय कामगाराने दाखवलेल्या या निस्पृह प्रामाणिकपणाचे संपूर्ण बारामती तालुक्यात कौतुक होत आहे.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
Dec 26, 2025 6:44 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
'मी महाराष्ट्रात पोट भरण्यासाठी आलोय..'; कामगाराने रस्त्यावर सापडलेलं सोनं केलं परत, बक्षीसही नाकारलं











