चंद्रपुरात काँग्रेसला भगदाड? युद्धात जिंकलेले तहात हरणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
चंद्रपूर महापालिकेत कुणालाच बहुमत नसल्याने राजकीय पेच निर्माण झाला आहे. इथं सर्वात मोठा पक्ष ठरलेला काँग्रेस फुटीच्या उंबरठ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे.
चंद्रपूर महानगर पालिकेत कुणाचा महापौर होणार? हा प्रश्न निवडणूक निकाल लागल्यापासून सगळ्यांना पडला आहे. इथं काँग्रेस हा सर्वात मोठा पक्ष ठरला असून काँग्रेसनं ६६ पैकी २७ जागा जिंकल्या आहेत. शिवाय शेकापचे ३ नगरसेवक देखील काँग्रेससोबत आहेत. अशात चंद्रपुरात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसला केवळ ४ नगरसेवकांची आवश्यकता आहे. इथं ठाकरे गट आणि वंचितचा गट किंग मेकरच्या भूमिकेत आहे. दोघांकडे एकूण आठ नगरसेवक आहेत. पण त्यांनी अद्याप काँग्रेसला पाठिंबा दिला नाही. त्यांनी महापौर पदावर दावा केला आहे. त्यामुळे इथं राजकीय पेच निर्माण झाला आहे.
याशिवाय काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यातील वादामुळे काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. अशात आता काँग्रेसचे १० नगरसेवक आपल्या संपर्कात असल्याचं विधान भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केलं आहे. चंद्रपुरात भाजपला २३ जागा मिळाल्या असून सत्तास्थापनेसाठी त्यांनी १० ते ११ नगरसेवकांची आवश्यकता आहे. अशात इथं काँग्रेसला भगदाड पडलं तर चंद्रपुरात भाजपचा महापौर होण्याची शक्यता आहे.
advertisement
या राजकीय घडामोडीवर भाष्य करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, महानगरपालिकेच्या महापौराच्या निवडणुकीच्या संदर्भातला कार्यक्रम जाहीर व्हायचा आहे. तोपर्यंत ज्यांनी ज्यांनी आम्हाला पाठिंबा द्यायची इच्छा व्यक्त केली आहे. त्यांच्यासोबत भाजपचा संवाद सुरू आहे. या आठवड्यात आमच्या गटनोंदणी करण्याकरिता अर्ज दाखल केला जाणार आहे. ठाकरे गटाने महापौर पदाची इच्छा व्यक्त केली आहे. शेवटी एखादा पक्ष इच्छा व्यक्त करतो, नंतर त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर निर्णय होतो, असंही मुनगंटीवार म्हणाले.
advertisement
काँग्रेसच्या फुटीबद्दल बोलताना मुनगंटीवारांनी सांगितलं की, चर्चा सर्वांच्याशी सुरू आहे...यामध्ये काँग्रेसच्या एक गट सुद्धा आमच्याशी संवाद करत आहे. काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी स्वतःहून आमच्याशी संपर्क केला आहे. पहिल्या फेरीची चर्चा त्यांच्याशी झालेली आहे.
किती लोक संपर्कात आहेत असं विचारलं असता सुधीर मुनगंटीवारांनी उत्तर देणं टाळलं आहे. सर्व गोष्टी सांगितल्या जात नाहीत. काही गोष्टींमध्ये गुप्तता ठेवावी लागते. सगळं सांगितलं तर बाकी लोक सावध होतील, असंही मुनगंटीवार म्हणाले.
Location :
Chandrapur,Maharashtra
First Published :
Jan 27, 2026 9:20 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चंद्रपुरात काँग्रेसला भगदाड? युद्धात जिंकलेले तहात हरणार? मुनगंटीवारांचं मोठं विधान










