सोलापुरात विमानतळ, IT पार्क, पाईपलाईनसाठी १ हजार कोटी, CM फडणवीसांच्या मोठ्या घोषणा
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Mumbai Solapur Airline: सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रारंभ बुधवारी झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रीतम पंडित, प्रतिनिधी, सोलापूर : अनेक वर्षे रखडलेला सोलापूरच्या विमानतळाचा प्रश्न आज मार्गी लागला, आज विमानसेवाही सुरू झाली. सोलापूरकरांसाठी आजचा आनंदाचा दिवस आहे. सोलापुरात विमानसेवा सुरू झाल्यामुळे उद्योगपती मोठी गुंतवणूक करतील. सोलापुरात आयटी हब उभारले जाईल तसेच शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी १ हजार कोटी दिले जातील, अशा मोठ्या घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या.
माओवादी नेता भूपतीसह ६० जणांच्या आत्मसमर्पणाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावून फडणवीस गडचिरोलीहून थेट सोलापूरला आले. सोलापूर ते मुंबई विमानसेवेचा प्रारंभ बुधवारी झाला. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला फडणवीस यांच्याह केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, पालकमंत्री जयकुमार गोरे, जिल्ह्यातील आमदार खासदार आदी नेते आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.
सोलापूर मुंबई विमान सेवेसाठी सरकारने तत्काळ १८ कोटी रुपये दिले
advertisement
एखाद्या जिल्ह्याचा विकास करायचा असेल तर संबंधित ठिकाणी हवाई सेवा महत्त्वाची असते. सोलापूरला हवाई सेवा झाल्याने त्यांचा संपर्क थेट मुंबईशी आणि पर्यायाने देश-जगाशी आला आहे. एकदा निर्यात सुरू झाली की आपण जगाशी जोडले जातो. त्यामुळे सोलापूरकरांसाठी आजचा दिवस अत्यंत आनंदाचा आहे, असे फडणवीस म्हणाले. सोलापूरमध्ये विमानतळ होते मात्र ते चालू नव्हते. अनेक वर्षापासून सोलापुरातील हवाई सेवा सुरू होऊ शकत नव्हती. आम्ही विचार केला की सोलापूर सारखी महत्त्वाचे विमान सेवा सुरू होण्यासाठी प्रयत्न करायला हवा. सोलापूर जवळ पंढरपूरचा पांडुरंग, स्वामी समर्थ, तुळजाभवानी यांच्यासारखी मंदिर आहेत. त्यामुळे विमानतळ सुरू झाले तर भक्तांचा ओघ वाढेल. सिद्धेश्वर साखर कारखान्याची एक चिमणी हलवल्यामुळे सोलापूरचा विकास आता वेगाने होणार आहे. पंतप्रधान मोदी यांनी सोलापूर विमानतळाचे नूतनीकरण केले. आम्ही सांगितले होते की हे मोदी सरकार आहे, निश्चित विमान सेवा सुरू होईल. मोदीजींनी विमान सेवाचे महत्त्व समजून घेतले आहे. सोलापूरसाठी आम्ही गॅप फंडिंग दिले आहे. जेव्हा तुम्ही मुंबईला कनेक्ट होता, तेव्हा संपूर्ण देशाला कनेक्ट होता. सोलापूर मुंबई विमान सेवेसाठी सरकारने तत्काळ १८ कोटी रुपये दिले, असे फडणवीस यांनी सांगितले.
advertisement
अचानक गडचिरोलीला जावे लागले
मुंबई येथून सोलापूरला विमानानेच येणार होतो मात्र मला गडचिरोलीला जावे लागले. गडचिरोलीला गेलो होतो. जहाल माओवादी भूपतीसह ६० जणांनी आत्मसमर्पण केले. मोदी-शहांच्या नेतृत्वात आपण राज्यातून पूर्णपणाने माओवाद संपवला, असे फडणवीस यांनी नमूद केले.
आयटी पार्क उभारणार, पाईप लाईनसाठी १ हजार कोटी देणार
मी आयटी पार्क संदर्भात सांगितले होते मात्र आयटी पार्क सुरू करण्यासाठी विमान सेवा महत्त्वाची होती. आता विमानसेवा सुरू झाल्याने त्यासंदर्भात लवकर पावले उचलण्यात येतील. आम्ही सोलापुरात मोठ्या प्रमाणावर रोजगाराची संधी उपलब्ध करणार आहोत. सोलापूर शहरासाठी पाणी पाईपलाईन साठी एक हजार रुपये कोटी रुपये देणार आहोत, पाईपलाईन पूर्ण झाली की सोलापूर शहरालाही इतर शहराप्रमाणे नळाने पाणी येईल, असे फडणवीस म्हणाले.
advertisement
सोलापूरला विमान सेवा सुरू झाल्याने भाविकांची संख्या तीन पटींनी वाढेल
सोलापूर हे दक्षिणेला जोडणारे द्वार आहे. सोलापुरातील विमान सेवेमुळे भाविकांची संख्या आता तीन पटीने वाढेल. देशात ७० वर्षात दहा कोटी लोकांनी विमानाने प्रवास केला आणि दहा वर्षात ३३ कोटी लोकांनी विमानाने प्रवास केला. जिल्ह्यातील पोलिसांना नवीन इमारती आपण दिल्या आहेत. कायदा सुव्यवस्था चांगली झाली तर गुंतवणूक येते, असेही फडणवीस म्हणाले.
advertisement
फडणवीस यांचा प्रणिती शिंदे यांना टोला
पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांच्या टीमचे मी मनापासून अभिनंदन करेल. यांनी शेवटच्या माणसापर्यंत जाऊन मदत केली. राज्यात सर्वात मोठे बत्तीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांसाठी दिले. हे सर्व पैसे या महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात गेले पाहिजेत. काही लोक या काळातही राजकारण करतात. सोलापुरात जो पूर आला तो नैसर्गिक आपत्ती नसून, सरकारमुळे आली, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी केली होती. त्यांना फुल देऊन गेटवेल सुन असे म्हणूयात, अशा शब्दात फडणवीस यांनी प्रणिती शिंदे यांना चिमटा काढला.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 15, 2025 3:52 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सोलापुरात विमानतळ, IT पार्क, पाईपलाईनसाठी १ हजार कोटी, CM फडणवीसांच्या मोठ्या घोषणा