शिंदेंच्या पराभूत नेत्याला 20 कोटी निधी? सरवणकरांच्या दाव्याने सरकार अडचणीत, अजितदादांचे हात वर!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Sada Sarwankar: शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
शरद जाधव, प्रतिनिधी, मुंबई: शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकरांच्या एका वक्तव्यानं राज्याच्या राजकारणात धुरळा उडवून दिलाय. विकासकामांसाठी निधी मिळत नाही अशी तक्रार विरोधक करत असताना मी आमदार नसताना मला 20 कोटींचा निधी मिळतो, असे म्हणत सरवणकरांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.
शिंदेंच्या शिवसेनेचे माजी आमदार सदा सरवणकर यांच्या या विधानानं महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. विरोधी रपक्षाचे आमदार निधी मिळत नाही म्हणून ओरडत असतानाच, माजी आमदार असलेल्या सदा सरवणकरांना तब्बल 20 कोटी रुपये मिळाले आहे. जिथे विद्यमान आमदारांना 2 कोटी मिळतात. मात्र मी आमदार नसताना 20 कोटी मिळतायत असे ते म्हणाले. त्याचवेळी माहिमचे विद्यमान आमदार महेश सावंत यांनी एवढा निधी मिळाला तर कुठे गेला? असा सवाल करत सरवणकरांची कोंडी करण्याचा प्रयत्न केला.
advertisement
सरवणकरांना 20 कोटींचा निधी, दाव्याने सरकार अडचणीत
सरवणकर यांच्या विधानानं राज्यातलं राजकारण तापण्याची शक्यता आहे. एकीकडे आमदारांना निधी मिळत नाही अशी तक्रार आणि ओरड मविआ आमदारांकडून वारंवार केली जातेय. मात्र आमदार नसलेल्या सरवणकरांना 20 कोटींचा निधी दिला जातोय. यामुळे विरोधक सरकार विरोधात आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय.
ज्याचं त्याला लखलाभ, अजित पवारांनी हात वर केले
advertisement
खरंतर सरवणकरांचा दावा खरा असेल तर, हे सरकारच्या अंगलट येवू शकतं. त्यामुळंच अजित पवारांनी याप्रकरणात ज्याचं त्याला लखलाभ म्हणत हात वर केल्याचं दिसतंय. तर शिवसेनेला सरवणकरांच्या विधानावर सारवासारव करण्याची वेळ आली.
पराभूत नेत्याला निधी कसा दिला जातो?
खरंतर विकासकामांचा निधी हा विद्यमान लोकप्रतिनिधींना मिळत असतो.. सद्यस्थितीत सदा सरवणकर हे आमदार नाहीत. त्यामुळं त्यांना जर खरंच 20 कोटींचा निधी मिळाला असेल, तर तो कसा देण्यात आला ? कोणत्या कामांमध्ये त्यांनी हा निधी वापरला? खरंच मतदारसंघात 20 कोटींची विकासकामं झाली का? असे अनेक सवाल यातून निर्माण होतात. ज्यांची उत्तर सरवणकर आणि त्यांच्या पक्षाला तसंच सत्ताधाऱ्यांना द्यावीच लागतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 10:08 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिंदेंच्या पराभूत नेत्याला 20 कोटी निधी? सरवणकरांच्या दाव्याने सरकार अडचणीत, अजितदादांचे हात वर!