Eknath Shinde BJP: भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का? बडा नेता हाती घेणार कमळ! ग्रामीण भागातील गणितं बदलणार
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde : भाजपच्या या मोठ्या चालीने एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाच्या घरातच फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे
सोलापूर: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. सत्ताधारी पक्षात विरोधकांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर इनकमिंग सुरू आहे. भाजप आपली स्थानिक पातळीवर आपली ताकद आणखी वाढवण्याच्या तयारीत असून शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
शिंदेंच्या निकटवर्तीयाच्या घरात फूट?
भाजपच्या या मोठ्या चालीने एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयाच्या घरातच फूट पडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते शिवाजी सावंत यांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) पालकमंत्री जयकुमार गोरे यांची सोलापुरात भेट घेतली असल्याचे वृत्त समोर आले आहे. सावंत यांनी बंद दाराआड पालकमंत्री गोरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा केली, त्यातून सावंतांच्या भाजप प्रवेशाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
advertisement
दरम्यान, माढा तालुक्यातील विकासकामांच्या निधी मागणीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे (Jaykumar Gore) यांची भेट घेतली. या वेळी विविध विषयांवर चर्चा झाल्याचेही शिवाजी सावंत यांनी सांगितले.
सोलापूर शहरातील वाडिया हॉस्पिटलमध्ये गोरे आणि शिवाजी सावंत (Shivaji Sawant) यांची भेट झाल्याचे वृत्त एका वृत्तसंकेतस्थळाने दिले. वाडिया हॉस्पिटलच्या एका खोलीत या दोन नेत्यांमध्ये शनिवारी चर्चा झाली आहे. त्यानंतर सावंत यांनी दिलेली प्रतिक्रिया यामुळे सावंत यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली आहे, त्यामुळे सोलापुरात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्का बसण्याची शक्यता आहे.
advertisement
शिंदे गटात नाराज, सावंतांचा पदाचा राजीनामा...
शिवसेना पक्षात सोलापूर जिल्ह्यातील निर्णय प्रक्रियेत विचारात घेतले जात नाही. पक्षाच्या संघटनात्मक निवडीबाबत कोणतेही अधिकार न देता परस्पर निवडी केल्या जातात, असा आरोप करून शिवसेनेचे संपर्कप्रमुख शिवाजी सावंत यांनी पंधरा दिवसांपूर्वी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. मात्र, संपर्कप्रमुखपदाचा राजीनामा देणाऱ्या सावंत यांची पक्षाच्या वरिष्ठांकडून साधी विचारपूसही करण्यात आली नाही, त्यामुळे चिडलेल्या सावंत समर्थकांनी शनिवारी (ता. 16 ऑगस्ट) माढ्यात एका बैठकीचे आयोजन केले होते. त्या बैठकीत सावंत समर्थकांनी पक्ष नेतृत्वाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या.
advertisement
आता, बस्स झालं....कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र!
या मेळाव्यात शिवसेनेच्या वरिष्ठांसह पक्षात नव्याने आलेल्या मंडळीवर सोलापूरचे माजी उपमहापौर दिलीप कोल्हे, संजय टोणपे, रवीना राठोड, मंगलताई कोल्हे, नवनाथ भजनावळे, मुन्ना साठे, जवाहर जाजू आदींनी जोरदार निशाणा साधला. ज्या पक्षात 25 वर्षांहून अधिक काळ घालवलेला असतानही शिवाजी सावंत यांना पक्षाच्या कामकाजात विश्वासात घेतले जात नसेल तर त्या पक्षात थांबण्याची गरजच नाही. आता शिवसेनेतून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. आता आपल्याला भारतीय जनता पक्षात जावे लागेल, अशीही भूमिका या कार्यकर्त्यांनी मांडली.
view commentsLocation :
Solapur,Maharashtra
First Published :
August 17, 2025 3:10 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde BJP: भाजपचा एकनाथ शिंदेंना धक्का? बडा नेता हाती घेणार कमळ! ग्रामीण भागातील गणितं बदलणार


