Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?
- Reported by:UDAY JADHAV
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Eknath Shinde : शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी येताना स्वीय सचिव, सुरक्षा रक्षकांना न आणण्याची सूचना केली आहे.
नागपूर: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महापालिका निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे नगर परिषदांच्या निवडणुकीत महायुतीमधील मतभेद समोर आले होते. त्यानंतर आता नागपूर अधिवेशनातही राजकीय घडामोडी घडण्याचे संकेत दिसून येत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज नागपुरात बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी येताना स्वीय सचिव, सुरक्षा रक्षकांना न आणण्याची सूचना केली आहे.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-शिंदे गटात हालचाली वेग आला आहे. याच संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज रात्री महत्त्वाची बैठक बोलावली आहे. रात्री ८ वाजता त्यांच्या शासकीय निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे. या बैठकीत आगामी रणनिती, उमेदवारांची तयारी आणि संघटनात्मक बदलांवर शिंदे मार्गदर्शन करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
या बैठकीसाठी शिंदे यांनी विशेष सूचना केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपमुख्यमंत्री शिंदे यांनी आजच्या बैठकीसाठी येताना स्वीय सचिव, सुरक्षा रक्षक किंवा कोणताही स्टाफ सोबत न आणण्याचे निर्देश दिले.
advertisement
या आदेशामुळे बैठकीची गोपनीयता वाढली असून, नेमकं काय चर्चा होणार याबाबत आमदारांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. शिंदे गटात अंतर्गत बदल, निवडणूक तिकीटांचे समीकरण, काही आमदारांबाबतची नाराजी आणि पक्षाच्या संघटनामध्ये होणारे फेरबदल या सर्व मुद्द्यांवर आज निर्णायक चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांमध्ये भाजपने शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक, स्थानिक पदाधिकारी आपल्याकडे खेचले होते. खुद्द एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजला जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यात भाजपने जोरदार धक्का दिला. कल्याण-डोंबिवली महापालिकेतही भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे.
advertisement
राज्यात राजकीय वातावरण तापत असताना आणि निवडणूक समीकरणे झपाट्याने बदलत असताना शिंदे यांची ही आकस्मिक बैठक राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण मानली जात आहे. बैठकीत झालेली चर्चा कोणत्याही पद्धतीने बाहेर माध्यमांमध्ये येऊ नये, यासाठी खबरदारी घेण्यात येत असल्याची चर्चा आहे.
बैठकीचे आमंत्रण कोणाला?
एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी होणाऱ्या बैठकीत शिवसेना शिंदे गटाचे मंत्री, आमदार यांना आमंत्रण धाडण्यात आले आहे. मंत्री आणि आमदारांना आपले स्वीय सचिवही न आणण्याची सूचना शिंदे यांनी केली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 08, 2025 2:48 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Shinde : ना पीएला एन्ट्री, ना सिक्युरीटीला प्रवेश, एकनाथ शिंदेंनी बोलावली 'सिक्रेट' बैठक, कोणाला दिलं आमंत्रण?









