'पक्ष प्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडलाय', शिंदेनी थेट शाहांपुढे वाचला भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तक्रारीचा पाढा
- Published by:Prachi Amale
Last Updated:
शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची तक्रार थेट अमित शाहांकडे केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे
प्रशांत लिला रामदास, प्रतिनिधी
नवी दिल्ली : भाजपच्या सोबत जाण्यासाठी ज्यांनी बंडाचं निशाण फडकावलं त्या भाजप आणि शिवसेनेतच आता वादाची ठिणगी पडलीय. स्थानिक पातळीवरच्या फोडाफोडीच्या राजकारणानं गंभीर रुप घेतलंय. इतकी की हा वाद आत्ता थेट दिल्लीपर्यंत पोहोचला आहे. आता दिल्लीतून मोठी महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी उलथापालथ करणारी बातमी समोर आली आहे. लेक श्रीकांत शिंदेच्या कल्याण- डोंबिवली मतदारसंघात झालेल्या पक्षप्रवेशाविषयी नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अमित शाहांसमोर व्यक्त केली आहे. एवढच नाही तर शिंदेंनी भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची तक्रार केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यानंतर महाराष्ट्राच्या राजकरणात मोठी खळबळ उडाली आहे.
advertisement
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भापने राबवलेल्या ऑपरेशन लोटसमुळे महायुतीत वादाची मोठी ठिणगी पडली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी एकापाठोपाठ माजी नगरसेवकांना आणि विविध पक्षातील मान्यवरांना अतिशय गुप्तेत भाजप पक्षात प्रवेश करून घेतल्याने विरोधकांसह युतीमधील शिवसेना शिंदे गटाला सुद्धा सुरुंग लावला. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंनी थेट दिल्ली गाठत अमित शाहांकडे तक्रार केली.राज्यात मंगळवारी भाजप आणि शिवसेनेमध्ये झालेल्या वादानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तडकाफडकी दिल्लीत दाखल झाले आहेत. राज्यात भाजप आणि शिवसेना यांच्यातील संघर्ष वाढलेला असताना शिंदे दिल्लीमध्ये पोहचले. दिल्लीत पोहचल्यानंतर त्यांनी अमित शाहांची निवासस्थानी भेट घेतली. या दोघांमध्ये जवळपास 50 मिनिटे चर्चा झाली. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यामुळे महायुतीत वाद निर्माण होत असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले आहे
advertisement
नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
महायुतीच्या विरोधातील बंडखोर नेत्यांना आर्थिक पाठबळ देण्याचे काम भाजपकडून होत असल्याची शहा यांच्याकडे तक्रार एकनाथ शिंदेंनी केली आहे. एवढच नाही तर पक्ष प्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडत असल्याचे देखील शिदेंनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या समन्वयकाचा दाखला देत नवीन प्रदेशाध्यक्षांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पूर्वी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी निर्णय न घेतल्यास मिनी विधानसभेत मोठा तोटा होण्याची शक्यता आहे.
advertisement
शिंदेंनी अमित शाहांकडे काय काय तक्रारी केल्या?
खासदार श्रीकांत शिंदे यांच्या लोकसभा मतदार संघात भाजपकडून शिवसेनेच्या माजी नगरसेवकांना पक्षप्रवेश दिला जात असल्यानं शिंदेंच्या मंत्र्यांनी नाराजी व्यक्त केली होती. नेमकी हीच नाराजी एकनाथ शिंदेंनी अमित शाह यांच्यासमोर केली. महायुती म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढण्याचं एकमताने ठरले असताना भाजपने ऐनवेळी भाजपने वेगळी चूल मांडल्याचे सांगत याविषयी नाराजी व्यक्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. महाविकास आघाडीतील पराभूत उमेदवारांना पक्षात प्रवेश देऊन ताकत दिल्यामुळे शिवसेनेतील नेते नाराज असल्याची माहिती देखील भाजप पक्षश्रेष्ठींना शिंदेंनी दिल्याची माहिती अमित शाहांना दिली आहे. अद्याप भाजपकडून कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
view commentsLocation :
Delhi
First Published :
November 19, 2025 8:31 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'पक्ष प्रवेशासाठी पैशांचा बाजार मांडलाय', शिंदेनी थेट शाहांपुढे वाचला भाजप प्रदेशाध्यक्षांच्या तक्रारीचा पाढा


