उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ अमोल कोल्हे यांचीही बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांना सुनावले
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Uddhav Thackeray And Amol kolhe Bag Checking: निवडणूक अधिकाऱ्यांनी बॅगा तपासल्याचा प्रसंग सांगत उद्धव ठाकरे आणि अमोल कोल्हे यांनी संताप व्यक्त केला.
सांगली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या बॅगांचीही तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. एकाच दिवशी विरोधी पक्षातील दोन नेत्यांच्या बॅगा तपासल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहेत. जसे विरोधी पक्षातील नेत्यांच्या बॅगा तपासता तसे सत्ताधारी पक्षातील नेत्यांच्या बॅगा तपासता का? असा सवाल कोल्हे यांनी विचारला. तसेच कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांनाही सुनावले.
यवतमाळच्या वणीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा संपन्न झाली. तत्पूर्वी वणीच्या हेलिपॅडवर उद्धव ठाकरे यांच्या बॅगेची तपासणी निवडणूक अधिकाऱ्यांकडून झाली. यावेळी उद्धव ठाकरे चांगलेच संतापलेले पाहायला मिळाले. जशी माझी बॅग तपासता, तशी मोदी-शाह-फडणवीस यांची तपासली का? तपासणार का? नियम असतात हे मान्य पण केवळ विरोधी पक्षातल्या नेत्यांनाच असतात काय? असे सावल करून निवडणूक अधिकाऱ्यांना उद्धव ठाकरे यांनी धारेवर धरले.
advertisement
सांगलीच्या विट्यात निवडणूक अधिकाऱ्यांनी माझी बॅग तपासली. विधानसभा निवडणुकीदरम्यान कर्जत जामखेडला माझ्या बॅगची तपासणी झाली होती. आजच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगची तपासणी झाली. नियम असतात हे मान्य आहे, पण नियम फक्त विरोधी पक्षांनाच असतात अन् सत्ताधाऱ्यांना सगळीकडे मोकळं रान असतं हे मान्य नाही. कायदा आहे, तर तो समानच असला पाहिजे, अशा शब्दात अमोल कोल्हे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना झापले.
advertisement
गुवाहाटीला मी गेलो नव्हतो...
दुसऱ्यांदा माझ्या बॅगा तपासण्यात आल्या. आम्ही नियमाच्या विरोधात नाही पण ज्याप्रमाणे आमच्या बॅगा चेक केल्या तशा सत्ताधाऱ्यांच्याही बॅगा चेक करा. त्यांच्या चेक केल्या, असा अनुभव आम्हाला आलेला नाही. लोकशाहीत हे काही बरे नाही. गुवाहाटीला कोण जाऊन आले भाजपला माहिती आहे आणि कुणाच्या गाडीमध्ये किती रोकड होती, हे देखील भाजपला माहिती आहे, अशी टोलेबाजीही त्यांनी केली.
advertisement
भाजपनेही आपल्या नेत्यांच्या बॅगा तपासू दिल्या पाहिजेत
आमच्या बॅगा जशा तपासता, तश्याच मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांच्या बॅग देखील तपासा. 2019 च्या निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगरमध्ये कोणत्या नेत्याचे आणि कोणत्या मुख्यमंत्र्याचं हेलिकॉप्टर उतरलं होतं, त्यांच्या बॅगामध्ये काय होते, त्याची उत्सुकता अजूनही लोकांच्या मनात आहे, लोकांना शंकाही आहे. भाजपाने हात झटकण्यापेक्षा त्यांच्या नेत्यांच्या बॅग देखील चेक होऊ द्याव्यात, असेही कोल्हे म्हणाले.
Location :
Sangli,Maharashtra
First Published :
November 11, 2024 6:25 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
उद्धव ठाकरे यांच्या पाठोपाठ अमोल कोल्हे यांचीही बॅग तपासली, निवडणूक अधिकाऱ्यांना सुनावले