साहित्य विश्वावर शोककळा! सुप्रसिद्ध कवी-हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन
- Published by:Ravindra Mane
- Reported by:SANJAY SHENDE
Last Updated:
महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, विनोदी लेखक आणि लोकप्रिय 'हास्यसम्राट' डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज (२८ नोव्हेंबर) सकाळी साडे सहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले.
अमरावती: महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी, विनोदी लेखक आणि लोकप्रिय 'हास्यसम्राट' डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचे आज (२८ नोव्हेंबर) सकाळी साडे सहा वाजता दीर्घ आजाराने निधन झाले. वयाच्या ६८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने मराठी साहित्य विश्वाला मोठा धक्का बसला आहे.
६ हजारांवर काव्यमैफिलींचे सादरीकरण
डॉ. मिर्झा रफी अहमद बेग हे केवळ कवी नव्हते, तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनातील एक अविभाज्य घटक होते. आपल्या ५० वर्षांच्या प्रदीर्घ कारकिर्दीत त्यांनी ६ हजारांहून अधिक काव्यमैफिलींचे सादरीकरण करून संपूर्ण महाराष्ट्राचं मन जिंकलं. त्यांची खास शैली, भेदक विनोद आणि रसिक प्रेक्षकांना खिळवून ठेवण्याची हातोटी यामुळे त्यांना 'हास्यसम्राट' म्हणून ओळखले जाई.
advertisement
मागील जवळपास ५० वर्षे ते विदर्भ आणि मराठवाड्यातील कवी संमेलनांचे केंद्रबिंदू होते. विदर्भातील काव्य संमेलने त्यांच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नसत. त्यांची विनोदबुद्धी आणि सामाजिक विषयांवरील मार्मिक भाष्य करण्याची कला, यामुळे त्यांचे कार्यक्रम नेहमीच हाऊसफुल्ल असायचे.
'वऱ्हाडी भाषेला' देशभर ओळख
मिर्झा रफी अहमद बेग यांनी आपल्या लेखणीतून वऱ्हाडी भाषेला एक आगळी ओळख मिळवून दिली. त्यांनी वऱ्हाडी भाषेचा गोडवा देशभरातील काव्यरसिकांपर्यंत पोहोचवला. त्यामुळे त्यांना 'वऱ्हाडी भाषेला देशभर ओळख देणारे लोककवी' म्हणूनही मोठी ख्याती मिळाली.
advertisement
त्यांनी आतापर्यंत २० काव्यसंग्रह प्रकाशित केले, जे साहित्यविश्वात अत्यंत लोकप्रिय ठरले. याशिवाय, त्यांचे 'मिर्झाजी कहिन' हे वृत्तपत्रांमधील स्तंभ प्रचंड लोकप्रिय होते, ज्यातून ते सामाजिक आणि राजकीय घटनांवर मार्मिक टिप्पणी करत असत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि दोन कन्या असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्रातील साहित्य आणि कला क्षेत्रावर शोककळा पसरली आहे. डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांच्या पार्थिवावर आज दुपारी दोन नंतर ईदगा कब्रस्तान, अमरावती येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
November 28, 2025 10:04 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
साहित्य विश्वावर शोककळा! सुप्रसिद्ध कवी-हास्यसम्राट डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचं निधन


