सिमेंट नव्हे, चुना होता तेव्हाचा आधार! रायगडाजवळ सापडला भव्य चुन्याचा घाणा, दुर्गसंवर्धकांच्या प्रयत्नांना यश!
- Published by:Arjun Nalavade
Last Updated:
रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत 'रॉयल रायगडकर प्रतिष्ठान'च्या दुर्गसंवर्धन संस्थेच्या तरुणांनी केलेल्या श्रमदानातून एक महत्त्वपूर्ण ऐतिहासिक शोध लागला आहे. स्वच्छता मोहीम राबवताना...
महाड, रायगड : किल्ले रायगड, स्वराज्याच्या राजधानीचा साक्षीदार. याच गडाच्या पायथ्याशी असलेल्या रायगडवाडीत एका दुर्गसंवर्धन संस्थेच्या तरुणांनी केलेल्या श्रमदानातून एक ऐतिहासिक ठेवा उजेडात आला आहे. वाडीतील ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी स्वच्छता मोहीम राबवत असताना, या तरुणांना एक संपूर्ण चुन्याचा घाणा आणि त्यात फिरणारे दगडी चाक सापडले आहे. हा शोध म्हणजे रायगड परिसरातील इतिहासाच्या अभ्यासात पडलेली एक मोलाची भर आहे.
'रॉयल रायगडकर प्रतिष्ठान'चे मोलाचे काम
महाडमधील 'रॉयल रायगडकर प्रतिष्ठान' ही संस्था रायगड तालुक्यातील ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी ओळखली जाते. या प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी यापूर्वी दासगाव येथील दौलतगड किल्ला आणि परिसरातील ऐतिहासिक बाराव (पायऱ्यांची विहीर) स्वच्छ करून संवर्धनाचे मोठे काम केले आहे. याच कार्याचा एक भाग म्हणून त्यांनी रायगडवाडी येथे स्वच्छता मोहीम हाती घेतली होती. वाडीतील कचरा आणि झाडीझुडपे साफ करत असतानाच त्यांना जमिनीत गाडलेल्या अवस्थेत हा भव्य चुन्याचा घाणा दिसला.
advertisement
काय असतो चुन्याचा घाणा?
पूर्वीच्या काळी किल्ले, तटबंदी किंवा इतर मोठी बांधकामे करण्यासाठी सिमेंटऐवजी चुना वापरला जात असे. हा चुना तयार करण्याची प्रक्रिया अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होती. चुन्याच्या घाण्यामध्ये चुनखडी, गूळ, बेलफळाचा गर आणि भाताचे तूस यांसारखे पदार्थ एकत्र करून ते दगडी चाकाखाली बारीक केले जात. हे चाक फिरवण्यासाठी बैलांचा वापर होई. या मिश्रणामुळे तयार होणारा चुना अतिशय मजबूत आणि टिकाऊ बनत असे, जो बांधकामासाठी वापरला जाई. किल्ले रायगडावर नाणे दरवाजाच्या मार्गावर आजही असाच एक घाणा पाहायला मिळतो.
advertisement
इतिहास अभ्यासकांचे मत
रायगडवाडीत सापडलेल्या या घाण्याचा व्यास तब्बल 10 फूट असून तो आकाराने खूप मोठा आहे. इतिहास अभ्यासकांच्या मते, "आतापर्यंत रोहिडा, विसापूर आणि वसंतगड यांसारख्या किल्ल्यांवर शिवकालीन चुन्याचे घाणे सापडले आहेत. रायगडवाडीत सापडलेला हा घाणा येथील गढी आणि इतर वास्तूंच्या बांधकामासाठी वापरला गेला असावा." या शोधामुळे रायगड परिसरातील तत्कालीन बांधकाम शैली आणि साधनसामग्रीवर अधिक प्रकाश पडण्यास मदत होणार आहे. रॉयल रायगडकर प्रतिष्ठानच्या या कार्यामुळे हा ऐतिहासिक ठेवा आता जगासमोर आला आहे.
advertisement
हे ही वाचा : Weather Alert: राज्यात पावसाची उघडीप, पण पश्चिम महाराष्ट्रात वेगळीच स्थिती, आज पुन्हा धो धो कोसळणार
हे ही वाचा : Weather Alert: मराठवाड्यातील हवामानात मोठे बदल, आज पाऊस की उघडीप, मंगळवारचा हवामान अंदाज
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 29, 2025 12:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
सिमेंट नव्हे, चुना होता तेव्हाचा आधार! रायगडाजवळ सापडला भव्य चुन्याचा घाणा, दुर्गसंवर्धकांच्या प्रयत्नांना यश!


