चाकूने सपासप वार, जीवलग दोस्ताला जागेवर संपवलं, मित्रांनीच केला मित्राचा खून
- Published by:Prachi Amale
Last Updated:
जालन्यातील अंबडच्या पारनेर गावातील तरुणांनी सख्ख्या मित्राला अतिशय क्रूर पद्धतीने संपवले. पोलिसांनी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
रवी जैस्वाल, प्रतिनिधी
जालना : अंबड तालुक्यातील पारनेर गावात धक्कादायक घटना घडली असून मित्रानेच मित्राची चाकूने वार करून निर्घृण हत्या केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. पवन बोराटे असे हत्या करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पवन बोराटे हा आपल्या घरी असताना त्याच्या 5 ते 6 मित्रांनी घरात घुसून त्याच्यावर चाकूने वार केल्याचा आरोप मयताच्या नातेवाईकांनी केला आहे. अचानक झालेल्या या हल्ल्यात पवन गंभीर जखमी झाला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या पवनला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
advertisement
नागरिकांमध्ये संताप
ही हत्या नेमक्या कोणत्या कारणातून झाली, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. मित्रांमध्ये कोणता वाद होता, आर्थिक व्यवहाराचा प्रश्न होता की वैयक्तिक वादातून ही घटना घडली, याचा तपास पोलीस करत आहेत. मात्र मित्रांनीच असा टोकाचा निर्णय घेतल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
संशयित आरोपींचा शोध सुरू
advertisement
घटनेची माहिती मिळताच अंबड पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून पुढील तपास सुरू केला आहे. संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आल्याची माहिती आहे.
कुटुंबावर दुःखाचा डोंगर
दरम्यान, पवन बोराटेच्या हत्येमुळे त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मयताच्या नातेवाईकांनी आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दोषींना लवकरात लवकर अटक करून त्यांना कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी गावकऱ्यांनीही केली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 4:12 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
चाकूने सपासप वार, जीवलग दोस्ताला जागेवर संपवलं, मित्रांनीच केला मित्राचा खून










