बॅनर लावून करा एसटी भाडेवाढीची घोषणा, जालनाकर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया...
- Reported by:Kale Narayan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
ST Ticket: राज्यातील एसटी बसच्या तिकीट दरांत मोठी वाढ करण्यात आली आहे. यावर जालन्यातील प्रवाशांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या आहेत.
नारायण काळे, प्रतिनिधी
जालना: लाल परीने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. विधानसभा निवडणुका संपताच राज्य सरकारने एसटी बसच्या प्रवासी भाड्यामध्ये 14.95% एवढी वाढ केली आहे. यामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला कात्री लागणार आहे. जालना ते संभाजीनगर हा प्रवास आता 15 रुपयांनी महागला असून जालना ते बीड हा प्रवास तब्बल 30 रुपयांनी महाग झाला आहे. तर जालना ते पुणे हा प्रवास करण्यासाठी प्रवाशांना तब्बल 65 रुपये अधिकचे मोजावे लागणार आहेत. बसच्या प्रवासी भाड्यामध्ये झालेल्या दरवाढीबाबत सर्वसामान्य प्रवाशांनी लोकल18 सोबत बोलताना आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.
advertisement
आता अधिकचे पैसे मोजावे लागणार
याआधी संभाजीनगरला प्रवास करण्यासाठी केवळ 90 रुपये एवढं प्रवासी भाडं होतं. यामध्ये तब्बल 14 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता 104 रुपये एवढं भाडं आकारलं जात आहे. तर बीडला जाण्यासाठी तब्बल 30 रपये अधिकचे द्यावे लागत आहेत. आधीच एवढी महागाई असताना बसचे तिकीटदर वाढवण्याचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. सरकारने प्रवाशांचा विचार केला पाहिजे, असे एक प्रवासी म्हणाला.
advertisement
भाडेवाढ निर्णयाचाही बॅनर लावावा
राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. आम्हाला कसलीही पूर्वकल्पना न देता अचानक ही दरवाढ करण्यात आली आहे. इतर वेळी ज्याप्रमाणे गाजावाजा करतात. तसंच आता देखील सरकारने बॅनर लावून दरवाढ केल्याचं सांगावं. एसटी बसमध्ये कोणत्याही पायाभूत सुविधा दिल्या जात नाहीत. मात्र दरवाढ केली जाते. यामुळे आमच्या खिशाला कात्री बसणार असून शासनाने हा निर्णय रद्द करावा अशी मागणी प्रवासी गणेश शिंदे यांनी केली.
advertisement
महिला प्रवाशांचीही नाराजी
जालना ते छत्रपती संभाजीनगर असा प्रवास करणाऱ्या महिला प्रवासी रत्नकला तिरुखे यांनी देखील राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली. मला देऊळगाव राजाहून जालना येण्यासाठी 15 रुपये लागायचे ते आता 20 रुपये लागत आहेत सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, असं त्यांनी म्हटलंय.
दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे वाढलेले पगार, इंधनाचे वाढीव दर, सुट्या भागांच्या वाढलेल्या किमती आदी कारणांमुळे ही भाडेवाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 26 ऑक्टोबर 2021 मध्ये 17.17 टक्के भाडेवाढ झाली होती. आता पुन्हा एकदा भाडेवाढ झाली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातून रोजंदारीसाठी प्रवास करणाऱ्या गोरगरीब वर्गावर ही दरवाढ खिशाला कात्री लावणारी ठरणार आहे. दरवाढीमुळे वाहक आणि प्रवाशांमध्ये सुट्या पैशांवरून वाद होण्याची शक्यता देखील वाढली आहे.
Location :
Jalna,Maharashtra
First Published :
Jan 25, 2025 2:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जालना/
बॅनर लावून करा एसटी भाडेवाढीची घोषणा, जालनाकर प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया...







