जयदेव ठाकरेंच्या बॉडीगार्डची बॅग आणि सरकारी पिस्तूल चोरीला, वांद्रे स्टेशनवरील घटना
- Published by:Prachi Amale
Last Updated:
बॅगेत पोलिसांचे सरकारी पिस्तूल, 29 जिवंत काडतुसे आणि इतर वैयक्तिक साहित्य असा एकूण सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
संकेत वरक, प्रतिनिधी
मुंबई: शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी सुरक्षारक्षक म्हणून कार्यरत असलेल्या पोलीस शिपायाची बॅग आणि सरकारी पिस्तूल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली आहे. बॅग चोरीला गेल्यानंतर वांद्रे रेल्वे पोलिसांनी तातडीने कारवाई केली. या प्रकरणात मुख्य आरोपी आशीष पिंड कश्यप याला अटक केली आहे. सुशांत जयराम गायकवाड (वय 32) असे तक्रारदार अंगरक्षकाचे नाव आहे. नवी मुंबईतील राज्य राखीव पोलीस दलात कार्यरत आहेत. सध्या ते जयदेव ठाकरे यांच्या वांद्रे येथील निवासस्थानी अंगरक्षक म्हणून कार्यरत होते.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार , 27 फेब्रुवारी रोजी गोरेगाव येथील एसआरपीएफ ग्रुप 8 येथे मासिक गोळीबार सराव पूर्ण करून ते वांद्रे येथे परतले होते. प्रवासाच्या थकव्यामुळे प्लॅटफॉर्मवर बसलेले असतानाच त्यांचा डोळा लागला. याच संधीचा फायदा घेत तिथे घुटमळणाऱ्या एका चोरट्याने गायकवाड यांच्या शेजारी ठेवलेली बॅग लंपास केली. या बॅगेत पोलिसांचे सरकारी पिस्तूल, 29 जिवंत काडतुसे आणि इतर वैयक्तिक साहित्य असा एकूण सुमारे 1 लाख 75 हजार रुपयांचा मुद्देमाल होता.
advertisement
बॅग उघडताच चोराचे धाबे दणाणले
आरोपी आशिष पिंड कश्यप हा एका केटररकडे कामाला आहे. त्याने पैशांच्या आमिषाने बॅग चोरली खरी, मात्र काही अंतरावर जाऊन बॅग उघडताच त्याचे धाबे दणाणले. बॅगेत चकाकणारे सरकारी पिस्तूल आणि काडतुसे पाहून तो प्रचंड घाबरला. पोलिसांच्या कचाट्यात सापडू नये या भीतीने त्याने ती चोरी केलेली बॅग चक्क पोलिसांच्याच एका उभ्या असलेल्या गाडीला लटकावून तिथून पळ काढला.
advertisement
सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने लागला शोध
आपली बॅग चोरीला गेल्याचे लक्षात येताच सुशांत गायकवाड यांनी वांद्रे लोहमार्ग पोलीस ठाण्यात धाव घेतली. सरकारी शस्त्र चोरीला गेल्याने हे प्रकरण अत्यंत गंभीर होते. रेल्वे पोलिसांनी तातडीने तपास पथके तयार केली आणि स्थानकावरील सीसीटीव्ही फुटेज पिंजून काढले. फुटेजमध्ये आशिष कश्यप संशयास्पदरीत्या बॅग नेताना दिसला. सीसीटीव्हीवरून पोलिसांनी अवघ्या काही तासांतच बॅगचा तपास लागला आणि चोरट्याच्या मुसक्या आवळल्या.
advertisement
पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक
लोहमार्ग पोलिसांनी दाखवलेल्या या तत्परतेमुळे एक मोठे संकट टळले आहे. जर हे शस्त्र चुकीच्या हातात पडले असते, तर मोठी दुर्घटना घडू शकली असती. या यशस्वी कारवाईबद्दल वांद्रे लोहमार्ग पोलिसांचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कौतुक केले जात आहे. आरोपीवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 04, 2026 6:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जयदेव ठाकरेंच्या बॉडीगार्डची बॅग आणि सरकारी पिस्तूल चोरीला, वांद्रे स्टेशनवरील घटना







