शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, महायुतीच्याच नेत्याने सुपारी दिल्याचा आरोप, गाडी अडवून...
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. इथं एका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे.
वीरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी करमाळा: सोलापूर जिल्ह्याच्या करमाळा तालुक्यात राजकीय वर्तुळाला हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. इथं एका शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. संबंधित शिवसेना नेते आज सकाळी आपल्या शेतात एकटे गेले होते. ते परत येत असताना त्यांची गाडी अडवून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात शिवसेना नेते जखमी झाले आहेत. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.
महेश चिवटे असं हल्ला झालेल्या शिवसेना नेत्याचं नाव आहे. ते शिवसेना जिल्हाप्रमुख आहेत. महेश चिवटे हे एकनाथ शिंदे यांचे माजी स्वीय सहाय्यक मंगेश चिवटे यांचे बंधू आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून मैदानात उतरण्याची तयारी केली होती. आज सकाळी महेश चिवटे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
या हल्ल्यानंतर चिवटे यांनी दिग्विजय बागल आणि रश्मी बागल यांच्यांवर गंभीर आरोप केला आहे. त्यांनीच सुपारी देऊन हा हल्ला केल्याचा आरोप चिवटे यांनी केला. दिग्विजय बागल हे माजी दिवंगत मंत्री दिगंबर बागल यांचे पुत्र आहेत. महेश चिवटे आज सकाळी आपल्या शेतात गेले होते. यावेळी त्यांची गाडी अडवून त्यांना बेदम मारहाण करण्यात आली.
advertisement
विशेष म्हणजे चिवटे यांनी ज्यांच्यावर आरोप केला, ते रश्मी आणि दिग्विजय बागल सध्या आहेत शिवसेना शिंदे गटात आहेत. यांनीच कथितपणे चिवटे यांच्यावर हल्ला केल्याने शिवसेनेतील अंतर्गत बंडाळी चव्हाट्यावर आली आहे. काही दिवसापूर्वी धमकी दिल्याप्रकरणी दिग्विजय बागल यांच्या विरोधात महेश चिवटे यांनी पोलीस तक्रार दिली होती.
बागलकडून सुपारी घेऊन मारहाण
या हल्ल्याबाबत माहिती देताना महेश चिवटे म्हणाले, "मकाई कारखान्याच्या सर्वेसर्वा रश्मी बागल आणि दिग्विजय बागल यांच्याकडून सुपारी घेऊन मनोज लांडगे नावाच्या तरुणाने माझ्यावर हल्ला केला. त्याने माझी गाडी आडवून बेदम मारहाण केली. लाठीकाठीने मारहाण केली. त्यावेळी मी एकटाच होतो. मी शेतात येत होतो. मला जीवे मारण्याचा त्याचा प्रयत्न होता. मी आता पोलिसांना फोन केला आहे. मी आता रश्मी बागल आणि दिग्विजय बागल तुला सांगतो, तू जर सुपारी देऊन अशाप्रकारे माणसं माझ्या अंगावर सोडत असशील, तर जशास तसं उत्तर यापुढे दिलं जाईल, हे लक्षात ठेव. तुलाही तुझा भाऊ आहे, हे ध्यानात ठेव."
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
October 04, 2025 10:36 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
शिवसेना नेत्यावर प्राणघातक हल्ला, महायुतीच्याच नेत्याने सुपारी दिल्याचा आरोप, गाडी अडवून...