हतबल विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकानं उचलला फायदा, घरात घुसून अत्याचार, कोल्हापुरला हादरवणारी घटना!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे.
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यात गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी एक संतापजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका मुख्याध्यापकानं शाळेतील अल्पवयीन माजी विद्यार्थिनीच्या हतबलतेचा फायदा घेऊन तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी आरोपी मुख्याध्यापकाला जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा ज्ञानू दाभोळे (वय ५५, रा. कागल) असं या संशयित मुख्याध्यापकाचं नाव असून, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
आजारपणाच्या बहाण्याने साधला संपर्क
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित मुलीची आई कोल्हापूर शहरात वास्तव्यास आहे. काही दिवसांपूर्वी आईची प्रकृती बिघडल्याने, तिच्या देखभालीसाठी ही अल्पवयीन मुलगी कोल्हापूरला आली होती. यावेळी संशयित मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे हा आईच्या प्रकृतीची विचारपूस करण्याच्या बहाण्याने घरी आला होता. यातून त्याने पीडित मुलीशी संपर्क वाढवला.
ऑगस्ट २०२५ मध्ये संशयित दाभोळे हा पीडित मुलीच्या घरी गेला होता. त्यावेळी घरात कोणीही नसल्याची संधी साधून त्याने अल्पवयीन मुलीवर पहिल्यांदा लैंगिक अत्याचार केला. तो एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने पीडितेला मुलाच्या फ्लॅटवर बोलावून घेतले आणि तिथेही तिच्यावर पुन्हा लैंगिक अत्याचार केला. मुख्याध्यापकाच्या या कृत्यामुळे पीडित मुलगी प्रचंड मानसिक तणावाखाली होती.
advertisement
आईने विचारपूस केल्यावर घटना उघडकीस
काही दिवसांपासून मुलीच्या वागण्यात झालेला बदल लक्षात आल्याने आईने मुलीला विश्वासात घेत विचारणा केली. यावेळी मुलीने मुख्याध्यापकाने केलेल्या अत्याचाराचा पाढा वाचला. हे ऐकून संपूर्ण कुटुंबाला मोठा धक्का बसला. पीडितेच्या आईने तात्काळ पोलीस अधीक्षक कार्यालय आणि महिला कक्षाकडे धाव घेऊन तक्रार नोंदवली.
पोलीस कारवाई आणि अटक
advertisement
घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी तातडीने गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याचे आदेश दिले. जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच, पोलिसांनी चक्रे फिरवून मुख्याध्यापक कृष्णा दाभोळे याला मुरगूड (ता. कागल) येथून बेड्या ठोकल्या. संशयिताविरुद्ध बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (POCSO) अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Jan 15, 2026 10:52 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
हतबल विद्यार्थिनीचा मुख्याध्यापकानं उचलला फायदा, घरात घुसून अत्याचार, कोल्हापुरला हादरवणारी घटना!









