कोल्हापूरवर पुराचं संकट कायम, पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, सध्याची स्थिती काय?
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र अजूनही कोल्हापूरवर पुराचं संकट कायम आहे.
ज्ञानेश्वर सालोखे, प्रतिनिधी कोल्हापूर: मागील तीन दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळला आहे. आता मुंबईसह काही भागात पावसाने उसंत घेतली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापुरात देखील पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र अजूनही कोल्हापूरवर पुराचं संकट कायम आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढताना दिसत आहे. अशात पुढच्या काही तासांत पावसाचा जोर वाढला तर कोल्हापुरकरांवर पुराचं संकट ओढावण्याची भीती आहे.
कोल्हापूर जिल्ह्यावर पुन्हा एकदा पुराचे सावट गडद होत आहे. पंचगंगा नदीची पाणी पातळी धोका पातळीकडे संथ गतीने वाटचाल करत असून, सध्या ती ४२ फूट ७ इंच इतकी नोंदवली गेली आहे. यामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.
जिल्ह्यातील सुमारे ७९ बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत, ज्यामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे. पुराचे पाणी आल्याने कोल्हापूर-पन्हाळा आणि कोल्हापूर-शिये हे महत्त्वाचे मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. पूरपरिस्थितीची शक्यता लक्षात घेऊन, पूरग्रस्त भागांतील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे काम सुरू आहे. कोल्हापूर शहरातील पूरक्षेत्र असलेल्या सुतारवाडा येथील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे अजूनही उघडे आहेत. त्यातून नदीपात्रात ४,३५६ क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्यामुळे नदीची पातळी आणखी वाढत आहे. पुराच्या पाण्यामुळे कोकणाकडे जाणारे अनेक मार्ग अजूनही बंद आहेत. मात्र, गगनबावडा मार्गावरील पाणी हळूहळू ओसरत असल्याचे दिलासादायक चित्र दिसत आहे. तरीही, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, नागरिकांनी सुरक्षितता बाळगावी असे आवाहन केले आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
August 21, 2025 7:33 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
कोल्हापूरवर पुराचं संकट कायम, पंचगंगेची पाणी पातळी धोका पातळीकडे, सध्याची स्थिती काय?


