बाप लेकाची पहिली भेट झालीच नाही! कोल्हापूरचा जवानाला वीरमरण, गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Niranjan Kamat
Last Updated:
Jawar Sunil Gujar: कोल्हापुरातील जवान सुनील गुजर मणिपूरमध्ये शहीद झाले. 5 महिन्याच्या मुलासोबतची त्यांची पहिली भेट अधुरीच राहिली.
कोल्हापूर: भारतीय सैन्यात सेवा बजावत असताना कोल्हापूरच्या जवान मणिपूरमध्ये शहीद झाला. भूस्खलन झाल्यानंतर रस्ता बनवत सैन्याचं वाहन 500 फूट खोल दरीत कोसळले. यात शित्तुर तर्फ मलकापूरचे जवान सुनील विठ्ठल गुजर हे शहीद झाले. चीन सीमेलगत झालेल्या भूस्खलनानंतर बर्फ कटिंगचे काम सुरू असताना हा अपघात झाला. या घटनेमुळे गावावर शोककळा पसरली असून पंचक्रोशित हळहळ व्यक्त होतेय.
सुनील हे मणिपूर येथे ‘110 बॉम्बे इंजिनिअर रेजिमेंटमध्ये ‘सॅपर’ म्हणून कार्यरत होते. 2019 मध्ये ते सेवेत रुजू झाले होते. मुंबई येथे बॉम्बे रेजिमेंट येथे मानवंदना देऊन त्यांचे पार्थिव आज, शनिवारी सायंकाळपर्यत मूळगावी आणण्यात येणार आहे. गावातच त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यसंस्कार होतील. त्यांच्या पश्चात वडील विठ्ठल गुजर, आई लक्ष्मी, पत्नी स्वप्नाली, मुलगा रियांश, भाऊ अक्षय आणि दोन बहिणी असा परिवार आहे.
advertisement
मुलाची पहिली भेट झालीच नाही
सुनील यांचा 2 वर्षांपूर्वी विवाह गावातीलच आबाजी पाटील यांची कन्या स्वप्नाली यांच्याशी झाला होता. सहा महिन्यांपूर्वी ते गावावरून अरुणाचल येथे रुजू झाले होते. त्यानंतर पाच महिन्यांपूर्वीच त्यांना मुलगा झाला आहे. मुलाचे जावळ आणि गावची यात्रा असल्याने 12 मार्चला ते गावी येणार होते. परंतु, भूस्खलन झाले आणि तातडीच्या सेवांसाठी रजा रद्द करण्यात आली. त्यामुळे बाप लेकाची पहिली भेट अधुरीच राहिल्याने गावात हळहळ व्यक्त होतेय.
advertisement
अत्यंत गरिबीतून सैन्यात भरती
view commentsसुनील यांच्या घरची गरिबी होती. वडील वडापावची गाडी चालवत आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत होते. अत्यंत संघर्षमय स्थितीत चिकाटी आणि मेहनतीने ते सैन्यात भरती झाले. सुनील यांचं प्राथमिक शिक्षण केंद्रीय प्राथमिक शाळा, शित्तूर तर्फ मलकापूर येथे, माध्यमिक शिक्षण माध्यमिक विद्यालय, शित्तूर तर बारावीचे शिक्षण हे समाज विकास विद्यालय, सागावला झाले. त्यांनी पदवीचं शिक्षण कळे (ता. पन्हाळा) येथे पूर्ण केले होते.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
March 15, 2025 4:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
बाप लेकाची पहिली भेट झालीच नाही! कोल्हापूरचा जवानाला वीरमरण, गाडी 500 फूट खोल दरीत कोसळली


