अनाथ मुलीला मिळालं नवं आयुष्य, कसा मिळाला अनुरूप जोडीदार? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
बालकल्याण संस्थेने 72 अनाथ, निराधार, निराश्रीत मुलींचे विवाहाव्दारे पुनर्वसन केले आहे.
कोल्हापूर, 28 ऑक्टोबर: लग्न समारंभातील गडबड, सर्वत्र प्रसन्न वातावरण, नवरी मुलीच्या चेहऱ्यावर नव्या घरी जाण्याचा आनंद आणि आपले राहते घर सोडून जाण्याचे दुःख.. असेच नेहमीचे चित्र कोल्हापुरात एका लग्न सोहळ्यात पाहायला मिळाले. फरक फक्त इतकाच होता मुलीचे माहेर म्हणजे एखादे घर नसून ती एक संस्था आहे. कोल्हापुरात बालकल्याण संकुल असे त्या संस्थेचे नाव. याच ठिकाणच्या म्हणजे कोल्हापूर जिल्हा परिवीक्षा व अनुरक्षण संघटना बालकल्याण संकुल संचलित कै. डॉ. अहिल्याबाई शं. दाभोळकर महिला आधारगृह या विभागातील सुस्मिताचा विवाह सोहळा नुकताच पार पडला. एकूणच आपले माहेर सोडून जाताना इतर मुलांप्रमाणे सुस्मिताच्याही डोळ्यात अश्रू तरळले.
किशोर आण्णासो पाटील हा कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हेरले गावचा एक तरुण आहे. त्याचे माध्यमिक शिक्षण कोल्हापूर येथे झाले आहे. सध्या तो सजीव नर्सरी कोल्हापूर येथे सुपरवाइझर म्हणून कार्यरत आहे. त्यांची स्वतःची एक एकर बागायती शेती आहे. मात्र आपण समाजाप्रती काहीतर देणं लागतो, या भावनेनेच या तरुणाने बालकल्याण संकुल मधील मुलीशी लग्न करण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणेच या संस्थेत लहानाची मोठी झालेल्या सुस्मिता या तरुणीशी त्याचा विवाहसोहळा पार पडला.
advertisement
सुस्मिता ही देखील आपले शिक्षण पूर्ण करुन काम करत असलेली संस्थेतील तरुणी आहे. लहानपणापासूनच ती बालकल्याण संकुल या संस्थेत वाढली आहे. शिक्षण पूर्ण करुन तिने संस्थेच्याच बालवाडीमध्ये मदतनीस म्हणून काम केले आहे. तर प्रथम एज्युकेशन या संस्थेतून नर्सिंगचा कोर्स देखील पूर्ण केला आहे. संस्थेत राहताना प्रत्येकाबरोबर हसत खेळत राहून तिने आपुलकीचे नाते निर्माण केले होते. त्यामुळेच लग्न करून सासरी जाताना तिला अश्रू अनावर झाले. त्याच बरोबर संस्थेमुळे माझे आयुष्य अजून उत्तम होणार असल्याच्या भावनाही तिने व्यक्त केल्या आहेत.
advertisement
आतापर्यंत 72 मुलींचे विवाह
आजपर्यंत बालकल्याण संस्थेने 72 अनाथ, निराधार, निराश्रीत मुलींचे विवाहाव्दारे पुनर्वसन केले आहे. त्यामुळे त्या सर्व मुलींचे आयुष्य बदलून गेले असून त्या सुखी संसारात रममाण झाल्या आहेत. सस्मिता देखील आमची लाडकी लेक असून तिला चांगले सासर मिळाले असल्याने आनंद वाटत असल्याच्या भावना बालकल्याण संकुलच्या मानद कार्यवाह पद्मजा तिवले यांनी व्यक्त केल्या आहेत. तसेच सुस्मिताच्या विवाहावेळी प्रा. सुनिता आणि विजय सदाशिव औताडे यांनी तिचे पालकत्व स्वीकारून कन्यादान केले आहे. तसेच या विवाह सोहळ्यात कोल्हापुरच्या तमाम दानशूर व्यक्ती, संस्था आणि आस्थापनांनी वेगवेगळ्या प्रकारची जबाबदारी उचलून मोठ्या थाटामाटात हा विवाह लावून दिल्याची माहिती देखील तिवले यांनी दिली आहे.
advertisement
दरम्यान, प्रत्येक मुलीचा आयुष्य हे लग्नानंतर बदलत असते तिला आपले स्वतःचे असे एक नवीन घर, एक परिवार मिळत असतो. त्यामुळेच सुखी मनाने सुश्मितानेही आपल्या नव्या आयुष्यात पाऊल टाकले आहे.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
October 29, 2023 9:15 AM IST