Shivrajyabhishek Sohala 2024 : कशा पद्धतीने बसवला होता मेघडंबरीवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा? पाहा रोमांचकारी अनुभव
- Published by:Aaditi Datar
Last Updated:
मेगडंबरीमध्ये काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या या पुतळ्याबद्दल देखील अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच हा पुतळा बनवणे आणि या मेघडंबरीत बसवतानाची घटना देखील अचंबित करणारी अशीच आहे.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा दरवर्षी भव्य दिव्य असा केला जात असतो. यावेळी हा सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी आणि रायगडावरील मेघडंबरीमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी प्रत्येक शिवभक्त गर्दी करत असतो. मात्र या मेगडंबरीमध्ये काही वर्षांपूर्वी बसवण्यात आलेल्या या पुतळ्याबद्दल देखील अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. त्यातच हा पुतळा बनवणे आणि या मेघडंबरीत बसवतानाची घटना देखील अचंबित करणारी अशीच आहे. अखिल भारतीय शिवराज्याभिषेक महोत्सव समितीचे संस्थापक अध्यक्ष इंद्रजित सावंत यांनी माहिती दिली आहे.
advertisement
सध्या रायगडावरील मेघडंबरीत असणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा 2009 साली कोल्हापूरच्या छत्रपती संभाजी राजेंच्या पुढाकाराने बसवण्यात आला आहे. त्याआधी ही मेघडंबरी मोकळीच होती. मेघडंबरीमध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्याची मोहीम ही साधरण 2007 सालापासून सुरू झाली होती. मेघडंबरीत पुतळा असावा की असू नये, याबाबत अनेक वाद झाले, पुरातत्व विभागाकडून पुतळा बसवण्यास विरोध करण्यात आला होता. कोल्हापुरातील सतीश घार्गे या शिल्पकाराकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
advertisement
Shiv Rajyabhishek 2024 : शिवराज्याभिषेक सोहळ्यावेळी जलाभिषेकासाठी कसे संकलित केले जाते पवित्र जल? पाहा Video
2008 साली शिल्पकाराच्या दिरंगाईमुळे पुतळा वेळेत तयार होऊ शकला नाही. त्यामुळे 2008 च्या शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त अगदी तसाच फायबरचा पुतळा तात्पुरता बनवून बसवण्यात आला. पण त्याचवर्षी मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनाधिष्टित पुतळा बसवण्यासाठी केंद्र सरकारकडून महाराष्ट्र शासनाला परवानगी पत्र मिळाली. मात्र महाराष्ट्र शासनाकडून पुतळा बसवण्यासंदर्भात कोणत्याही हालचाली झालेल्या दिसल्या नाहीत. त्यामुळे कोल्हापूरच्या शिल्पकारांसह अगदी काही मावळ्यांनी मिळून ब्रांझचा पुतळा बनवून तो 2009 साली मेघडंबरीत बसवला होता. त्यानंतर अखेर तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत तोच पुतळा कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. आज हा पुतळा मेघदंबरीत सर्वांना पाहायला मिळत असून सर्वांच्या भावनांचा विषय बनला आहे, असे इंद्रजित सावंत यांनी सांगितले आहे.
advertisement
कोल्हापूरात बनवून रायगडावर नेला पुतळा
एकूण चार भागांमध्ये बनवण्यात आलेला शिवछत्रपतींचा पुतळा हा 2009 साली 31 मे च्या रात्री बारा वाजता रायगडला नेण्यास सुरुवात झाली होती. समिती सचिव राहुल भोसले आणि कोल्हापुरातल्या पंचवीस शिवभक्त मंडळींनी हा पुतळा 01 जूनला रायगडाच्या पायथ्याला पोहचवला. खरंतर हा पुतळा चार भागांमध्ये होता. यामध्ये बाजूने सिंह असणाऱ्या सिंहासनाचा एक भाग, शिवाजी महाराजांची मुख्य प्रतिमा, महाराजांच्या हातातली तलवार आणि पाठीमागची प्रभावळ असे हे वेगवेगळे भाग होते. प्रभावळ आणि तलवार हे त्याचे वजनाने हलके होते. पण मुख्य शिवाजी महाराजांचा पुतळा हा जवळजवळ पाचशे ते साडेपाचशे किलो वजनाचा आहे. त्यामुळे पुतळ्याचे सर्व भाग गडावर न्यायचे कसे, याचा अभ्यास करुन चाचणी घेण्यात आली होती. समितीतील राहुल भोसले हे स्वतः एक इंजिनियर असल्याने त्यांनी पुतळावर नेण्यासाठी अँगल तयार केले होते. त्यावेळी टप्प्याटप्प्यात 01 जून ते 04 जूनच्या मध्यरात्रीपर्यंत फक्त पंचवीस तीस शिवभक्तांनी मिळून हा पुतळा अत्यंत कष्टाने गडावर नेला होता. तलवार आणि प्रभावळीचा भाग रोप वे मार्गाने वर आणण्यात आला, अशी माहिती इंग्रजीत सावंत यांनी दिली आहे.
advertisement
पुतळा गडावर नेणे होते अवघड काम
रायगडाच्या पायथ्याशी नेलेला पुतळा वर मेघदंबरीपर्यंत पोहोचवणे हे खूप कष्टाचे आणि जीवावर बेतणारे काम होते. जवळपास अर्ध्या टनाचा पुतळा शिवभक्तांनी आपल्या खांद्यावर उचलून वरती नेला होता. काही ठिकाणी तर पुतळा कड्यावरुन दरीत पडतोय की काय, अशी परिस्थितीही उद्भवली होती. त्यातच शिवभक्तांना पाण्याच्या बाटल्या, अन्न पोहचवणे या सगळ्या जबाबदाऱ्या वेगवेगळ्या लोकांनी सांभाळल्या होत्या. अशा परिस्थितीत 05 जून 2009 रोजी दुपारी हा पुतळा मेघडंबरीत आरुढ करण्यात आला. 6 जून 2009 रोजी युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा लोकार्पण केला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा पुतळा कायम ठेवण्याचे आदेश दिले. तेव्हापासून आजतागायत हा पुतळा अखंड भारतासह जगभरातील शिवभक्तांच्या मनात घर करून आहे, असे हे सावंत यांनी स्पष्ट केले आहे.
advertisement
दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांवरील अखंड प्रेम आणि मनातील भक्ती यामुळेच त्या शिवभक्त मावळ्यांना इतका वजनदार पुतळा चक्क खांद्यांवरून आणि हाताने उचलून गडाच्या पायथ्यापासून ते वरपर्यंत नेणे शक्य झाले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच आज जगभरातील तमाम शिवभक्त मेघडंबरीवरील त्या पुतळ्यासमोर नतमस्तक होत असतात.
Location :
First Published :
June 05, 2024 5:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Shivrajyabhishek Sohala 2024 : कशा पद्धतीने बसवला होता मेघडंबरीवरील छत्रपती शिवरायांचा पुतळा? पाहा रोमांचकारी अनुभव