भाजपचा पक्षांतर्गत सर्जीकल स्ट्राईक, 18 जणांना बाहेरचा रस्ता, लातूरमध्ये मोठी घडामोड!
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे. 18 महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने पक्षांतर्गत मोठी कारवाई केली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याचा ठपका ठेवत भाजपाने लातूरमधील १८ महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. शहर जिल्हाध्यक्ष अजित पाटील कव्हेकर यांनी रविवारी (११ जानेवारी) या संदर्भात अधिकृत घोषणा केली.
बंडाचे निशाण पडले महागात
लातूर महानगरपालिकेच्या ७० जागांसाठी येत्या १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्यापासूनच भाजपामध्ये नाराजी नाट्य सुरू होते. अनेक निष्ठावंत कार्यकर्त्यांनी आपल्याला डावलून बाहेरून आलेल्या 'आयाराम' उमेदवारांना तिकीट दिल्याची तक्रार केली होती. या नाराजीचे रूपांतर बंडखोरीत झाले आणि बऱ्याच पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध अपक्ष म्हणून दंड थोपटले.
advertisement
भाजपाने या बंडखोरांना माघार घेण्याचे आवाहन केले होते, मात्र त्यांनी निवडणूक लढवण्यावर ठाम राहण्याचा निर्णय घेतला. अखेर पक्षाने कठोर पाऊल उचलत या १८ जणांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करून त्यांना ६ वर्षांसाठी बाहेरचा रस्ता दाखवला आहे.
पक्षाची भूमिका काय?
निलंबनाची माहिती देताना अजित पाटील कव्हेकर म्हणाले की, भाजपा हा शिस्तप्रिय पक्ष आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या या महत्त्वाच्या टप्प्यावर सर्व पदाधिकाऱ्यांनी पक्षाची धोरणे आणि निर्णयांचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र, काही जणांकडून जाणीवपूर्वक पक्षशिस्त मोडली जात असल्याचे आणि संघटनात्मक शिस्तीला बाधा पोहोचत असल्याचे निदर्शनास आले. कोअर कमिटीच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाल्यानंतर या १८ जणांवर निलंबनाची कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला.
advertisement
निवडणुकीवर काय परिणाम होणार?
लातूर महापालिकेत सत्ता मिळवण्यासाठी भाजपा आणि काँग्रेस यांच्यात मोठी चुरस आहे. अशातच पक्षाच्या १८ पदाधिकाऱ्यांचे निलंबन झाल्याने अंतर्गत गोंधळ चव्हाट्यावर आला आहे. बंडखोर उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांच्या मतांचे विभाजन होण्याची भीती भाजपाला सतावत आहे.
view commentsLocation :
Latur,Maharashtra
First Published :
Jan 12, 2026 12:51 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपचा पक्षांतर्गत सर्जीकल स्ट्राईक, 18 जणांना बाहेरचा रस्ता, लातूरमध्ये मोठी घडामोड!










