Ashok Chavan : प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या अशोक चव्हाणांची गाडी अडवली, नांदेडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा
- Published by:Shreyas
Last Updated:
नांदेडमध्ये आज पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात अशोक चव्हाण आले होते.
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड : नांदेडमध्ये आज पुन्हा एकदा खासदार अशोक चव्हाण यांना मराठा आंदोलकांच्या रोषाचा सामना करावा लागला. अर्धापूर तालुक्यातील कोंढा गावात अशोक चव्हाण आले होते. भाजप उमेदवाराच्या प्रचारासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, या बैठकीसाठी अशोक चव्हाण गेले तेव्हा मराठा आंदोलकांनी त्यांना विरोध केला. अशोक चव्हाणांचा ताफा मराठा तरुणांनी अडवला आणि गावात जायला त्यांना मज्जाव करण्यात आला, यावेळी मोठा जमाव जमला होता. पोलिसांनी जमावातून अशोक चव्हाणांची गाडी बाहेर काढली. मराठा आंदोलकांचा रोष पाहून अशोक चव्हाणांना परत जावं लागलं होतं. यापूर्वी धर्माबादमध्येही अशोक चव्हाणांना मराठा आंदोलकांनी विरोध केला होता.
advertisement
अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया
दरम्यान या नारेबाजीवर अशोक चव्हाणांनी प्रतिक्रिया दिली. आजचा प्रकार राजकीय आहे, लोकशाहीत प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. आम्ही सुद्धा मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ काम करत आहोत, पुढेही करत राहू, असं अशोक चव्हाण म्हणाले.
'या विषयावर राजकारण करायचं नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे, पण वैयक्तिक स्वार्थापोटी काही मोजके लोक गैरसमज निर्माण करून समाजाची दिशाभूल करत आहेत. हा मराठा आरक्षणाची चळवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे, अशा मंडळींना लोकही चांगलेच ओळखून आहेत', असं प्रत्युत्तर अशोक चव्हाणांनी दिलं.
advertisement
'हा प्रश्न सुटला पाहिजे, यासाठी प्रयत्न करत आहोत. आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे, मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे असोत,' असं आवाहनही अशोक चव्हाणांनी केलं. तसंच या घटनेबाबत आपण पोलिसात तक्रार करणार नाही, असं अशोक चव्हाणांनी स्पष्ट केलं.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
April 01, 2024 4:30 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ashok Chavan : प्रचारासाठी मैदानात उतरलेल्या अशोक चव्हाणांची गाडी अडवली, नांदेडमध्ये हाय व्होल्टेज ड्रामा