पुढच्या तीन महिन्यात कदाचित LPG गॅस बंद होईल, केंद्र सरकारच्या बैठकीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी विज्ञान भवन नवी दिल्ली येथील बैठकीत सहभाग नोंदवला. या बैठकीत देशभरात गॅसचा प्रचंड तुटवडा आणि करण्यात येणार असल्याच्या उपाययोजनांवर चर्चा झाल्याची माहिती आहे.
मुंबई : तीन महिन्यांनी कदाचित एलपीजी गॅसचा पुरवठा बंद होऊ शकतो, असे वक्तव्य महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले. एलपीजी गॅसचा पुरवठा बंद करण्याबाबतच्या केंद्र सरकारच्या पत्रकाचा उल्लेख करीत राज्यात पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्कचा विस्तार अधिक वेगाने व्हायला पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी विज्ञान भवन नवी दिल्ली येथे निवासी आणि व्यावसायिक आस्थापनांना एलपीजी आणि पीएनजी गॅसचा अधिक चांगला आणि सुलभ पुरवठा उपलब्ध करून देणे, तसेच निश्चित कालावधीत पीएनजी सेवांचा विस्तार करणेबाबत केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर, केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत सहभाग नोंदविला.
advertisement
नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये PNG सुविधा अनिवार्य करावी
स्वच्छ इंधनाच्या उपलब्धतेत वाढ तसेच पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) नेटवर्कच्या विस्तारासंदर्भात या बैठकीत चर्चा झाली. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी विविध सूचना या बैठकीत मांडल्या. PNG विस्तार जलदगतीने व्हावा यासाठी नवीन गृहनिर्माण प्रकल्पांमध्ये PNG सुविधा अनिवार्य करावी, जुन्या वसाहतींमध्ये जोडणीसाठी विशेष मोहिमा राबवाव्यात, व्यावसायिक आस्थापनांसाठी हॉटेल, रेस्टॉरंट व लघुउद्योगांसाठी PNG वापर वाढविणे गरजेचे आहे. यामुळे खर्च कमी होऊन पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होतो तसेच परवाना आणि जोडणी प्रक्रिया सुलभ करावी अशा सूचना केल्या.
advertisement
पाइपद्वारे नैसर्गिक वायू (पीएनजी) नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने व्हावा
त्याचबरोबर महाराष्ट्रात शहर गॅस वितरण (CGD) प्रकल्पांची अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी राज्य शासनाने परवानगी प्रक्रिया अधिक सुलभ व गतिमान केली असून, व्यवसाय सुलभतेला चालना दिली आहे. तसेच, विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमधील दरांचे मानकीकरण करून प्रकल्पांच्या अंमलबजावणीस आवश्यक ती गती दिली जात आहे. पीएनजी नेटवर्कचा राज्यभर विस्तार अधिक वेगाने करण्यासाठी केंद्र शासनाकडून तांत्रिक सहाय्य तसेच पायाभूत सुविधा उभारणीसाठी आर्थिक पाठबळ आवश्यक असल्याचे भुजबळ यांनी म्हटले आहे.
advertisement
पीएनजी नेटवर्कसाठी आर्थिक आणि पायाभूत सहाय्य देण्यात याव्यात
महाराष्ट्रातील सर्व शहरांमध्ये पीएनजी नेटवर्क विस्तारासाठी विशेष आर्थिक तसेच पायाभूत सहाय्य देण्यात यावे, ज्यायोगे प्रकल्पांची व्यवहार्यता वाढेल व घरगुती जोडण्यांचा विस्तार वेगाने होईल. तसेच पीएनजी पाइपलाइन विस्तारासाठी आवश्यक मंजुरी प्रक्रिया केंद्रीय संस्थांकडून अधिक समन्वयाने व वेळेत पूर्ण करण्यात यावी व वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक वापरासाठी एलपीजीचे वाटप वाढविण्यात यावे अशी मागणी भुजबळ यांनी केली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 28, 2026 3:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुढच्या तीन महिन्यात कदाचित LPG गॅस बंद होईल, केंद्र सरकारच्या बैठकीनंतर छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य






