Jalgaon: दोन मित्र जीवावर उठले, 5 दिवसांपासून बेपत्ता असलेला निलेश आढळला भयावह अवस्थेत, मन सुन्न करणारी घटना
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय निलेश राजेंद्र कासार या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव जिल्ह्यातून एक मन सुन्न करणारी घटना समोर आली आहे. गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जामनेर येथील २७ वर्षीय निलेश राजेंद्र कासार या तरुणाची त्याच्याच दोन मित्रांनी जुन्या वादातून निर्घृण हत्या केल्याचं उघड झालं आहे. निलेशचा मृतदेह रामदेववाडी परिसरातील जंगलात असलेल्या एका तलावात पोत्यात बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून जळगाव जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला.
नेमकी घटना काय?
मिळालेली माहिती अशी की, जामनेर येथील रहिवासी असलेला निलेश राजेंद्र कासार हा १५ डिसेंबरच्या रात्रीपासून अचानक बेपत्ता झाला होता. कुटुंबियांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, मात्र त्याचा काहीच थांगपत्ता लागला नाही. तपासादरम्यान निलेशची दुचाकी जळगावनजीकच्या रामदेववाडी परिसरात बेवारस स्थितीत आढळली. यामुळे घातपाताचा संशय बळावला आणि एमआयडीसी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगानं फिरवली.
advertisement
दोन संशयितांना गुजरातमधून अटक
एमआयडीसी पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय खबऱ्यांच्या आधारे तपास सुरू केला असता, निलेशच्या दोन मित्रांवर संशय बळावला. घटनेनंतर हे दोघेही फरार झाले होते. पोलिसांनी त्यांचा माग काढत दोघांना गुजरातमधून ताब्यात घेतलं. दोन्ही आरोपींना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी निलेशच्या हत्येची कबुली दिली.
असा लावला मृतदेहाचा छडा
संशयितांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी जुन्या वादातून ही हत्या केली. निलेशचा खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्याचा मृतदेह एका पोत्यात भरला आणि रामदेववाडी जंगलातील तलावात फेकून दिला. आज सकाळी पोलिसांनी या ठिकाणी शोधमोहीम राबवली असता, तलावात तरंगणारे ते पोते सापडले. त्यात निलेशचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह मिळून आला.
advertisement
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
निलेशचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात आणण्यात आला. यावेळी निलेशच्या नातेवाईकांनी आणि मित्रपरिवाराने मोठी गर्दी केली होती. आपला तरुण मुलगा आता या जगात नाही, हे समजताच आई-वडिलांनी केलेला आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. सध्या एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या हत्येमागे आणखी काही कारणे आहेत का? याचा तपास पोलीस करत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Dec 19, 2025 1:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon: दोन मित्र जीवावर उठले, 5 दिवसांपासून बेपत्ता असलेला निलेश आढळला भयावह अवस्थेत, मन सुन्न करणारी घटना










