Crime : तू है मेरी किरण! पतीच्या घरी जळून मृत्यू, पण कराडमध्ये तरुणासोबत सापडली, मग तो मृतदेह कुणाचा?
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
विवाहितेचा जळलेला मृतदेह आढळला, पण नंतर विवाहिताच जिवंत निघाली. विवाहिता जिवंत असेल तर मग जळालेला मृतदेह कुणाचा होता? मंगळवेढ्यामध्ये झालेल्या या मृत्यूचं गूढ वाढत चाललं आहे.
विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी
पंढरपूर : विवाहितेचा जळलेला मृतदेह आढळला, पण नंतर विवाहिताच जिवंत निघाली. विवाहिता जिवंत असेल तर मग जळालेला मृतदेह कुणाचा होता? मंगळवेढ्यामध्ये झालेल्या या मृत्यूचं गूढ वाढत चाललं आहे. एखाद्या हॉरर चित्रपटालाही लाजवेल, अशी मृत्यूची थरारक घटना मंगळवेढ्यामध्ये घडली आहे. मंगळवेढ्यातील पाटकळमध्ये एका विवाहितेचा जळीत अवस्थेमधील मृतदेह सापडला, यानंतर पोलीस तपासही झाला, मात्र संबंधित विवाहित महिला जिवंत असल्याचं निष्पन्न झालं आहे.
advertisement
मंगळवेढा तालुक्यातील पाटकळ गावात नागेश सावंत आणि त्यांच्या पत्नी किरण राहत होत्या. 14 जुलै रोजी पहाटेच्या सुमारास किरणने आपल्या शेतातील कडब्याच्या गंजीत स्वत:ला पेटवून घेतल्याची घटना घडली. यानंतर किरणचा नवरा नागेश हा पत्नीच्या मृत्यूमुळे रडत होता, त्याचवेळी किरणचे वडील घटनास्थळी पोहोचले.
किरणच्या वडिलांनाही आपल्या मुलीचा मृतदेह ओळखता आला नाही. यानंतर किरणच्या वडिलांना तात्काळ पोलिसांना आपल्या मृत्यूची चौकशी करण्याची विनंती केली. किरणने आयुष्य संपवलं नसून तिची हत्या झाल्याचा संशय माहेरच्यांनी व्यक्त केला, त्यानंतर पोलिसांनी तपासही सुरू केला. पण मृत्यू झालेली किरण कराडमध्ये एका तरुणासोबत राहत असल्याचं आढळून आलं.
advertisement
किरण आणि तिच्यासोबत असलेल्या तरुणाची पोलीस सध्या चौकशी करत आहेत. मात्र या सर्व घडामोडींमध्ये किरण जिवंत असेल तर कडब्याच्या गंजीत नेमका कोणत्या महिलेचा मृतदेह जळाला? याचं गूढ अजून उकलेलं नाही. दरम्यान संबंधित मृतदेहाचे सॅम्पल फॉरेन्सिक लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आलं आहे. मात्र एखाद्या चित्रपटालाही लाजवेल, असा मृत्यूचा थरार मंगळवेढ्यात घडला आहे.
Location :
Mangalvedhe (Mangalwedha),Solapur,Maharashtra
First Published :
July 16, 2025 12:02 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Crime : तू है मेरी किरण! पतीच्या घरी जळून मृत्यू, पण कराडमध्ये तरुणासोबत सापडली, मग तो मृतदेह कुणाचा?