Maratha Reservation : काँग्रेसच्या बैठकीत घुसले 60 मराठा आंदोलक, नांदेडमध्ये पुन्हा राडा
- Published by:Shreyas
Last Updated:
नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलक घुसल्यामुळे गोंधळ झाला आहे. काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत 50 ते 60 मराठा आंदोलक घुसले.
मुजीब शेख, प्रतिनिधी
नांदेड : नांदेडमध्ये काँग्रेसच्या बैठकीत मराठा आंदोलक घुसल्यामुळे गोंधळ झाला आहे. काँग्रेसच्या विभागीय आढावा बैठकीत 50 ते 60 मराठा आंदोलक घुसले. या आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, मात्र पोलिसांना न जुमानता सर्व आंदोलक सभागृहात घुसले. यावेळी व्यासपीठावर काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेनिथला, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, सभागृहनेते बाळासाहेब थोरात यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते.
advertisement
सभागृहात घुसताच मराठा आंदोलकांनी एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी सुरू केली. बैठकीत अचानक मराठा आंदोलक घुसल्यामुळे काही काळ गोंधळ उडाला होता. आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांना मराठा आरक्षणासंदर्भात जाब विचारला.
मराठा आरक्षणासंदर्भात काँग्रेस पक्षाची, केंद्राची आणि राज्याची भूमिका काय आहे? हे जाहीर करा. मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी आहे, त्या मागणीला तुमचं समर्थन आहे का नाही? हे सांगा. गुळमुळीत भूमिका घेऊ नका. लोकसभेत मराठा समाजाने साथ दिली, तुम्ही फक्त मराठा समाजाचा वापर केला का? असा जाब मराठा आंदोलकांनी काँग्रेस नेत्यांना विचारला. तसंच आताच भूमिका स्पष्ट करा, अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. काँग्रेस नेत्यांनी मराठा आंदोलकांचं ऐकून घेतलं आणि त्यांचं निवेदन स्वीकारलं.
advertisement
याआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे नांदेडमध्ये असतानाही मराठा आंदोलकांनी गोंधळ घातला होता. राज ठाकरे ज्या हॉटेलमध्ये थांबले होते, त्या हॉटेलमध्ये जाऊन राज ठाकरेंसोबत कॅमेरासमोर चर्चा करण्याची मागणी केली. तसंच नांदेडमध्ये मराठा आंदोलकांनी राज ठाकरेंचा ताफाही अडवला.
Location :
Nanded,Maharashtra
First Published :
August 11, 2024 3:23 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Maratha Reservation : काँग्रेसच्या बैठकीत घुसले 60 मराठा आंदोलक, नांदेडमध्ये पुन्हा राडा