Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांनी मध्यरात्रीच उचललं, मीरा-भाईंदरमधील मोर्चा आधीच कारवाई
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
MNS Leader Avinath Jadhav : आज मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना घरातून ताब्यात घेतलं आहे
अजित मांढरे, प्रतिनिधी, ठाणे: मीरा-भाईंदर शहरामध्ये मराठी आणि अमराठी वाद निर्माण झाल्यानंतर राज्यासह देशात याचे पडसाद पाहायला मिळाले. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चाच्या विरोधात आज मीरा-भाईंदर मध्ये मराठी भाषा व मराठी अस्मितेसाठी मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. मात्र, पोलिसांनी मध्यरात्रीच्या सुमारास मनसे नेते अविनाश जाधव यांना घरातून ताब्यात घेतलं आहे.
मराठी भाषेच्या हक्कांसाठी मिरा रोड येथे आज (मंगळवार) मनसेकडून आयोजित करण्यात आलेल्या मराठी मोर्च्याआधीच नाट्यमय घडामोड घडली. मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्षअविनाश जाधव यांना पोलिसांनी आज पहाटे 3.30 वाजता त्यांच्या ठाण्यातील राहत्या घरातून ताब्यात घेतलं आहे.
पोलिसांनी आधीच जाधव यांना मिरा भाईंदर क्षेत्रात प्रवेश करण्यास मनाई करणारी नोटीस बजावली होती. उद्याच्या रात्रीपर्यंत त्यांच्यावर ही बंदी लागू होती. मात्र, मोर्चात त्यांचा सहभाग होणार असल्याची शक्यता गृहित धरून पोलिसांनी सकाळच्या आधीच ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे.
advertisement
मीरा-भाईंदरमधील एका मिठाईच्या दुकानदाराला मनसैनिकांनी मारहाण केली होती. त्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर 3 जुलै रोजी बिगर मराठी व्यापारी दुकानदारांनी बंद पुकारत मोर्चा काढला होता. या मोर्चात मराठीभाषिकांविरोधातही टिप्पणी करण्यात आली होती. त्यानंतर मनसे नेते अविनाश जाधव यांनी हा मोर्चाला भाजपची फूस असल्याचा आरोप केला. मारहाणी मागील घटना सांगताना मराठी आणि महाराष्ट्राचा अपमान सहन कसा करायचा असा सवाल केला. या मोर्चाविरोधात 8 जुलै रोजी मोर्चा काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते. त्यानंतर विविध मराठी संघटनांसह आज मनसेने मोर्चाची हाक दिली होती. मात्र, मोर्चा आधीच पोलिसांनी जाधवांना अटक केली.
advertisement
मराठी मोर्चाचा धसका, व्यापारी नरमले...
मराठी माणसांच्या मोर्चाआधीच मीरा-भाईंदरमधील व्यापारी नरमले आहे. त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पोलिसांना दिले आहे. आम्ही काढलेला मोर्चा मराठी माणूस, मराठी भाषेच्या विरोधात नव्हता, ज्यांनी मारहाण केली त्या व्यक्तीच्या विरोधात असल्याचे पत्रात म्हटले आहे. कोणाच्या भावना दुखावले असतील त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो असं लेखी निवेदन पोलीस उपायुक्त प्रकाश गायकवाड यांना व्यापारी संघाकडून देण्यात आले. मराठी बांधवांचे मन दुखविण्याचे आमचे कोणतेही प्रयोजन नव्हते. मात्र राजकीयदृष्ट्या चुकीचा संदेश मोर्चामधून संपूर्ण महाराष्ट्रभर गेला. आजपर्यंत मराठी बांधवांसोबत आम्ही अतिशय गुण्यागोविंदाने राहतो. आमच्यात कधीच भांडणे झाली नाहीत. एका व्यापाऱ्यासोबत मारहाणीची घटना झाल्यानंतर समाज म्हणून एक प्रतिक्रिया आली, असेही व्यापारी संघाने म्हटले.
Location :
Thane,Thane,Maharashtra
First Published :
July 08, 2025 7:08 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Avinash Jadhav : मनसे नेते अविनाश जाधवांना पोलिसांनी मध्यरात्रीच उचललं, मीरा-भाईंदरमधील मोर्चा आधीच कारवाई