Mumbai Water Supply: धरणं तुडुंब तरीही पाणी टंचाई! मुंबईतील पाणी तुटवड्याचं कारण काय?
- Published by:Vrushali Kedar
- local18
Last Updated:
Mumbai Water Supply: विविध गरजा भागवण्यासाठी मुंबईला दररोज 4,500 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे.
मुंबई: महानगरी मुंबईतील कोट्यवधी रहिवाशांना दररोज कित्येक लीटर पाण्याची गरज भासते. शहराच्या बाह्यभागात विविध ठिकाणी असलेल्या तलावांमधून ही गरज भागवली जाते. समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुंबई शहराला सुमारे दररोज 3950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत आहे. तरी देखील अनेक नागरिकांपर्यंत पाणी पोहचत नसल्याची तक्रार आहे. सरसकट मुंबईकरांना मुबलक पाणीच मिळत नसल्याच्या वस्तुस्थिती समोर येत आहे. सध्या शहरात सुमारे 500 दशलक्ष लिटरपेक्षा जास्त पाण्याचा तुटवडा भासत आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाण्याशी संबंधित असलेल्या विविध गरजा भागवण्यासाठी मुंबईला दररोज 4,500 दशलक्ष लिटर पाण्याची गरज आहे. पण, प्रत्यक्षात 3950 दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होतो. यातही गळती होऊन सुमारे 280 ते 300 दशलक्ष लिटर पाणी वाया जाते. त्यामुळे मुंबईच्या अनेक भागात पाण्याचा अपुरा पुरवठा होतो. विशेषतः जलाशयापासून लांब असलेले भाग आणि झोपडपट्टी परिसरात पाणीटंचाई भासते.
advertisement
महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागातील एका वरिष्ठ अभियंत्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबई शहराला सध्या 7 धरणांतून पाणीपुरवठा होतो. भातसा धरणातून रोज 2050 दशलक्ष लीटर म्हणजेच 50 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीपुरवठा होतो. मुंबई महानगरपालिकेचे स्वतःचे 5 तलाव असूनही मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारीत असलेल्या तलावांवर अवलंबून राहावं लागत आहे. त्यामुळे गारगाई व पिंजाळ पाणीपुरवठा प्रकल्पाचं काम तातडीने होण्याची गरज आहे.
advertisement
मुंबई महानगरपालिकेने केलेल्या अभ्यासानुसार 2041 पर्यंत मुंबईला दररोज 6,535 दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासेल. एवढ्या मोठ्या प्रमाणात मागणी पूर्ण करण्यासाठी महापालिकेला गारगाई, पिंजाळ, दमणगंगा पिंजाळ नदीजोड प्रकल्प हाती घ्यावे लागणार आहेत. मुंबई महापालिकेने पाण्याचे नवीन स्त्रोत निर्माण करावेत अशी शिफारस डॉ. एम. ए. चितळे यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या तज्ज्ञ समितीनी केली होती. मात्र, महापालिकेने याकडे दुर्लक्ष केलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात शहरात मोठ्या प्रमाणात पाणी संकट निर्माण होऊ शकतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 21, 2025 11:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Water Supply: धरणं तुडुंब तरीही पाणी टंचाई! मुंबईतील पाणी तुटवड्याचं कारण काय?