BJP Candidate: भाजपचा दबाव अन् कार्यकर्त्यांचा 'गनिमी कावा'! उमेदवाराला घरात कोंडलं, नागपुरात निवडणुकीपूर्वीच मोठा राडा
- Reported by:Uday Timande
- Written by:Shrikant Bhosale
Last Updated:
Nagpur Election : नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच नागपूरमध्ये नाट्यमय आणि धक्कादायक प्रकार घडला आहे.
नागपूर: नागपूर महानगरपालिका निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीच नागपूरमध्ये नाट्यमय आणि धक्कादायक प्रकार घडला आहे. उमेदवाराने अर्ज माघारी घेऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी थेट घरातच कोंडून ठेवले. यामुळे नागपूरच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
प्रभाग क्रमांक १३ ड मधील उमेदवार किसन गावंडे यांनी उमेदवारी मागे घेण्यासाठी बाहेर जाऊ नये म्हणून त्यांच्या परिसरातील नागरिक आणि समर्थकांनी थेट त्यांनाच घरात बंद करून ठेवल्याची घटना समोर आली आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, प्रभाग १३ ड मधून भाजपकडून किसन गावंडे आणि विजय होले यांना एबी फॉर्म देण्यात आला होता. मात्र, नंतर पक्षाने रणनीतीत बदल करत किसन गावंडे यांना उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या सूचना दिल्या. वेळेवर अर्ज मागे घेण्यास सांगण्यात आल्याने गावंडे यांची भाजपकडील अधिकृत उमेदवारी रद्द झाली असून, ते सध्या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवत आहेत.
advertisement
पक्षाकडून अर्ज मागे घेण्याचा दबाव वाढताच, गावंडे यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी पसरली. परिसरातील नागरिक आणि समर्थकांनी किसन गावंडे यांनी कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मागे घेऊ नये, असा ठाम आग्रह धरला. याच पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असताना, गावंडे यांना बाहेर जाऊन अर्ज मागे घेता येऊ नये म्हणून समर्थकांनी त्यांच्या घराला कुलूप लावल्याची माहिती समोर आली आहे.
advertisement
सध्या किसन गावंडे हे घराच्या आतच असल्याचे सांगण्यात येत असून, परिसरात मोठ्या प्रमाणावर तणावाचे वातावरण आहे. या घटनेमुळे नागपूर प्रभाग १३ ड मधील निवडणूक लढत अधिकच रंगतदार बनली आहे. दरम्यान, या प्रकरणावर अद्याप भाजपकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी घडलेल्या या घटनेची चांगलीच चर्चा रंगली आहे.
advertisement
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 12:19 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
BJP Candidate: भाजपचा दबाव अन् कार्यकर्त्यांचा 'गनिमी कावा'! उमेदवाराला घरात कोंडलं, नागपुरात निवडणुकीपूर्वीच मोठा राडा







