गांधीजींनी बांधलेला ऐतिहासिक ठेवा संकटात, नागपूरकरांची मागणी कधी मान्य होणार?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गांधीजींच्या आयुष्यातील एका घटनेचा साक्षीदार असलेला ठेवा नागपूरमध्ये आहे. पण, या ऐतिहासिक ठेव्याकडं अक्षरश: दुर्लक्ष झालंय.
नागपूर, 2 ऑक्टोबर : महात्मा गांधींनी सत्य, अहिंसा आणि सत्याग्रह या मार्गाच्या अवलंब करत देशाच्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य वेचलं. अशा राष्ट्रपिता महात्मा गांधीजींची जयंती 2 ऑक्टोबरला देशभर साजरी केली जाते. देशकार्य सोबतच समाजातील अनेक अनिष्ट प्रथांना छेद देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य त्यांनी केलं. गांधीजींच्या आयुष्यातील एका घटनेचा साक्षीदार असलेला ठेवा नागपूरमध्ये आहे. पण, या ऐतिहासिक ठेव्याकडं अक्षरश: दुर्लक्ष झालंय.
स्वातंत्र्यपूर्व काळात समाजात अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या सफाई कामगारांना सार्वजनिक ठिकाणी पाणी पिण्यास मज्जाव होता. हा अन्याय दूर व्हावा म्हणून नागपुरातील सफाई कामगारांनी विशेष आंदोलन उभे केले आणि आवाज उठविला. महात्मा गांधी याच कालावधीमध्ये काँग्रेसच्या आंदोलनासाठी नागपुरात आले होते.
या आंदोलनाची माहिती मिळताच गांधीजींनी या आंदोलनाचे नेतृत्व करत 8 नोव्हेंबर 1933 रोजी बोरकर नगरातील मध्यवर्ती भागात या अस्पृश्य समजल्या जाणाऱ्या लोकांसाठी सार्वजनिक विहिरीची पायाभरणी केली. समाजात अस्पृश्यता, जातीपाती, सारख्या अनिष्ट प्रथांना यामुळे मुठमाती मिळाली समाजिक एकतेचे प्रतीक विहिरीच्या निमित्याने उभारण्यात आले.
advertisement
गांधीजींनी केलं लोकार्पण
विहिरीचे लोकार्पण स्वत: महात्मा गांधी यांनी केले असून तसा उल्लेख देखील विहिरीच्या आतील कानशिलात कोरला आहे. स्वातंत्र्य संग्राम सैनिक पुनमचन्द राका आणि ज्येष्ठ नागरिक जंगलूजी बढेल यांनी या विहिरीच्या देखभालीची जबाबदारी हाती घेतली होती. ही विहीर बोरकर नगरातीलच नव्हे तर आजूबाजूच्या नागरिकांसाठी जीवनदायी ठरली.
सिनेकलावंत आणि काँग्रेसचे दिवंगत नेते सुनील दत्त यांनीही या विहिरीला भेट दिली होती. यावेळी त्यांनी परिसरातील लहान मुलांना विहिरीच्या पाण्याद्वारे अंघोळ घालून दिली होती, अशी माहिती स्थानिक देतात. गांधीजींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या ही विहीर 'गांधी विहीर' म्हणूनच प्रसिध्द आहे. या विशेष विहिरीला राष्ट्रीय स्मारक घोषित करा, अशी मागणी वेळोवेळी करण्यात आली आहे, अशी माहिती स्थानिकांनी दिली.
advertisement
'गांधी विहिरीची' दुर्दशा
view commentsऐतिहासिक आणि सामाजिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या या 'गांधी विहिरीची' आज घडीला दुर्दशा झालेली आहे. 1995 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी विहिरीच्या सौंदर्यीकरणाचे उद्घाटन केले होते. परंतु देखभाल अभावी काही वर्षातच सर्वच नष्ट झाले. नागपूर मनपातर्फे या विहिरीलगत गटार लाईन टाकण्याचे काम झाले. येथील नागरिकांनी याला विरोधही केला, परंतु अधिकाऱ्यांसमोर कुणाचे काहीच चालले नाही. सध्या या विहिरीला गटारीची घाण लागली असून पाण्याला दुर्गंधी सुटली आहे. महात्मा गांधी यांच्या या ऐतिहासिक ठेव्याकडं तातडीनं लक्ष द्यावं अशी मागणी नागपूरकर करत आहेत.
Location :
Nagpur,Maharashtra
First Published :
October 02, 2023 11:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
गांधीजींनी बांधलेला ऐतिहासिक ठेवा संकटात, नागपूरकरांची मागणी कधी मान्य होणार?

